खेड : शहरात पावसाळ्यात फैलावणारी डेंगीची साथ नियंत्रणात आणून त्यावर योग्य त्या उपाययोजना करण्यासाठी आरोग्य विभागाने प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचारी, आरोग्य सहाय्यक यांच्यामार्फत १७ प्रभागांमध्ये सर्वेक्षण केले. त्यात डासांच्या उत्पत्तीचे ‘स्पॉट’ निश्चित करून ते नष्ट करण्याची कार्यवाही सुरू केली आहे. शहरातील इमारत बांधकामाच्या ठिकाणी डासांची सर्वाधिक पैदास होत असल्याचे आढळले आहे.
राष्ट्रीय कीटकजन्य रोगनियंत्रण कार्यक्रमांतर्गत जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये, जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. संतोष जाधव, तालुका वैद्यकीय अधिकारी शैलेश खरडमोल यांच्या मार्गदर्शनाखाली जोखीमग्रस्त भागात ” कंटेनर सर्वेक्षण मोहीम राबवण्यात आली. या सर्वेक्षणानुसार डासांच्या उत्पत्तीची ठिकाणे निश्चित केली आहेत.
क्षेत्रफळनगर येथील कोकण व्हॅली इमारत बांधकाम ठिकाण, डाकबंगला रोड येथील तुंबणारी गटारे, गुलमोहर पार्क आदी बांधकामाच्या ठिकाणी डासांची उत्पत्ती होत असल्याचे निष्पन्न झाले आहे. खेड शहरातील शिवाजीनगर परिसर, महात्मा फुले नगर, बौद्धवाडी परिसर, एकविरा व साईबाबा मंदिराशेजारी तसेच दापोलीनाका परिसर, तळ्याचे वाकण येथे सुरू असलेल्या इमारत बांधकामाच्या ठिकाणी डासांची पैदास होऊन डेंगीचा फैलाव वेगाने होत असल्याचे समोर आले आहे. तुंबणारी गटारे, साठे मोहल्ला, कुंभारआळी परिसर, साई मंदिर परिसरातील इमारत बांधकामाच्या ठिकाणी डासांची उत्पत्ती सर्वाधिक होत असल्याचे उघड झाले.
डास निर्मूलनाच्या सूचना
पोलिस वसाहतीतील भंगार वाहने, वाणीपेठ परिसर, तांबे मोहल्ला परिसर, गुजरआळी परिसरातील इमारत बांधकामांसह तुंबणाऱ्या गटारांमुळे डासांची उत्पत्ती होऊन डेंगीचा प्रादुर्भाव वाढत असल्याचा निष्कर्ष केला आहे. डेंगीची साथ फैलावू नये, याकरिता पावसाळ्यापूर्वीच प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवण्याबाबत तालुका आरोग्य विभागाने प्रशासनाला सूचित केले आहे. डासांच्या उत्पत्तीची सर्व ठिकाणे तातडीने नष्ट करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:38 AM 14/Apr/2025














