रत्नागिरी : नवीन शैक्षणिक वर्षासाठी शाळा प्रवेश नोंदणीसाठी लगबग

रत्नागिरी : शैक्षणिक वर्षाअखेर असून नवीन शैक्षणिक वर्षातील प्रवेशांची लगबग शाळास्तरांवर सुरु झाली आहे. शाळेच्या पटसंख्या वाढीसाठी शिक्षकांची कसरत सुरु आहे. बालवाडी ते दहावीपर्यंतच्या प्रवेश नोंदणीसाठी विद्यार्थी व पालकांना आकर्षित करण्यासाठी जाहिरातबाजी केली जात आहे. काही खाजगी शाळांमध्ये ग्रुप अॅडमिशनवर फीसवलतीसह विविध ऑफर्स ही ठेवण्यात आल्या आहेत.

काळानुसार शिक्षण क्षेत्रातही बदल होत आहेत. नवीन बदल आत्मसात करत पुढे जाण्याला शाळा व्यवस्थापनांकडून प्राधान्य दिले जात आहे. शैक्षणिक संस्था व शाळांची संख्या वाढत असल्याने खाजगी शाळांसह जिल्हा परिषदेच्या शाळांनादेखील विद्यार्थी प्रवेशासाठी स्पर्धा वाढली आहे. त्यामुळे संचमान्यतेसह शिक्षकांचे समायोजन थांबवण्यासाठी विद्यार्थी पटसंख्या कायम राखण्यासाठी शिक्षकांना कसरत करावी लागत आहे.

या पार्श्वभूमीवर बहुतांश खाजगी शाळांमध्ये प्रवेश नोंदणी सुरु झाली आहे. सध्या शाळांस्तरावर वार्षिक परीक्षा सुरु आहेत. त्याचबरोबर महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेमार्फत नियतकालिका मूल्यांकन चाचणी म्हणजेच पॅट परीक्षांचे नियोजन सुरु आहे. प्रवेश नोंदणी करुन घेतली जात असून प्रवेश निश्चिती दि. १ मे नंतरच केली जाणार आहे.

आपल्या शाळेत जास्तीत जास्त प्रवेश नोंदणी कशी होईल यावर सर्वच शाळांकडून भर दिला जात आहे. प्रवेश व पट वाढीसाठी विविध फंडे अजमावले जात आहेत. त्यासाठी शाळेतील सोयी सुविधा, राबवण्यात येणारे उपक्रम, मार्गदर्शन वर्ग, कार्यशाळा, यशस्वी विद्यार्थ्यांची माहिती आदिंची जोरदार जाहिरात बाजी केली जात आहे. तसेच एकत्रित प्रवेश किंवा एकाच कुटुंब, नात्यातील पालकांनी एकाच वेळी पाल्याचा प्रवेश घेतल्यास वार्षिक वर्गणीमध्ये सवलत यांसारख्या ऑफरही दिल्या जात आहेत. पालकांचे मतपरिवर्तन करुन आपलीच शाळा कशी सरस आहे, यासाठी शिक्षक वर्गाची धडपड सुरु आहे. चालू शैक्षणिक वर्षातील कामकाज सांभाळत प्रवेश नोंदणीचे काम करताना शाळा व्यवस्थापनासह शिक्षकांची तारेवरची कसरत सुरु आहे.

Happy journey english

पाल्याचा प्रवेश म्हणजे पालकांची प्रतिष्ठा…
नामांकित शाळेत पाल्याचा प्रवेश मिळणे म्हणजे पालकांची प्रतिष्ठेचा विषय ठरत आहे. त्यामुळे पाल्याचा प्रवेशासाठी पालकांची कसरत सुरु झाली आहे. ठराविक शाळांसाठी पालक आग्रही राहत असल्याने काही शाळांकडे गर्दी तर काही शाळांकडे पाठ असा विरोधाभास ही जाणवत आहे. गर्दीच्या पाठीमागे जाण्याची मानसिकता प्रवेश प्रक्रियेतील आव्हान ठरत आहे.

शैक्षणिक गुणवत्तेची पडताळणी
वाढत्या महागाईबरोबर शैक्षणिक खर्चही वाढला आहे. त्यामुळे शाळांच्या फीदेखील वाढत आहेत. त्यामुळे पालकांचे आर्थिक गणित कोलमडत आहे. मात्र स्पर्धेच्या युगात आपला पाल्य मागे पडायला नको, याची काळजीदेखील पालकांकडून घेतली जात आहे. त्यामुळे शाळा प्रवेशावेळी पालकांकडून शाळेचा शैक्षणिक गुणवत्ता पडताळली जात आहे. शैक्षणिक दर्जा व फीचा समतोल राखला जातोय का, याचाही विचार पालकांकडून केला जात आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
17:52 PM 14/Apr/2025