राजापूर : तालुक्याच्या पूर्व परिसरातील रायपाटण येथील ग्रामीण रुग्णालयात शुक्रवारी एक सुखद घटना घडली. हृदय बंद पडलेल्या पाचल येथील ४५ वर्षीय महिलेला तत्काळ उपचारासाठी दाखल करण्यात आले. रायपाटण ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टर आणि त्यांच्या स्टाफने तत्काळ उपचारांना सुरवात केली. हृदय प्रक्रिया पूर्ववत सुरु करण्यासाठी पम्पिंग (सीपीआर) प्रक्रिया सुरु झाली आणि काय चमत्कार… काही क्षणात त्या महिलेच्या बंद पडलेल्या हृदयाची प्रक्रिया पूर्ववत सुरु झाली आणि तिला जीवनदान मिळाले. ही बातमी हाहा म्हणता संपूर्ण परिसरात पसरली आणि सवाँनी रायपाटण ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी आणि त्याचे कर्तव्यावरील कौतुकाचा वर्षाव सुरु झाला.
शनिवारी पाचलमधील वहिदा प्रभूलकर या ४५ वर्षीय अत्यवस्थ महिलेला रायपाटण ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. तिची स्थिती अत्यंत नाजूक बनली होती. समोर आलेल्या माहितीनुसार तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यावेळी तिच्या हृदयाची स्पंदने जवळजवळ बंद झाली होती. मागील काही दिवस रावपाटण ग्रामीण रुग्णालयात उपचार करणारे वैद्यकीय अधिकारी डा. सूर्यकुमार पंदेरीकर आणि रुग्णालयात कार्यरत असलेल्या सर्व कर्मचाऱ्यांनी प्रसंग ओळखून तत्काळ उपचारांना सुरुवात केली. बंद पडलेली हृदय प्रक्रिया पूर्ववत सुरु करण्यासाठी पम्पिंग उपचार सेवा सुरु केली आणि चमत्कारच घडला. ती महिला सुरु केलेल्या उपचारांना प्रतिसाद देऊ लागली. हळुहळू तिची हदय प्रक्रिया पूर्ववत सुरु झाली. वेळीच उपचार करून रायपाटणमधील वैद्यकीय अधिकारी आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांनी त्या महिलेला धोक्याबाहेर काढताना तिचा जीव वाचवला.
या घटनेनंतर अनेकांनी रायपाटण ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी, सर्व कर्मचारी यांचे जोरदार कौतुक केले. रायपाटण ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. पंदेरीकर, कर्मचारी सायली शिंदे, यशश्री कारेकर, प्रतीक्षा दाते, वेदांत कोटकर, अक्षय नादकुळे, श्रीमती तेरवणकर, समीर बारस्कर आणि सर्व स्टाफ यांच्यामुळे एका महिलेला जीवनदान मिळाले. रायपाटणचे सरपंच नीलेश चांद व त्यांचे सहकारी तसेच ग्रामस्थांनी डॉ. पंदेरीकर आणि कर्मचारी यांची यासाठी प्रशंसा केली.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:50 PM 14/Apr/2025














