चिपळूण, दि. 14 एप्रिल 2025 : चिपळूण येथील महिला पत्रकार स्वाती हडकर यांच्यावर रविवारी रात्री वाळू माफियांकडून जीवघेणा हल्ला आणि विनयभंगाचा प्रयत्न झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या हल्ल्यात त्या गंभीर जखमी झाल्या असून, कामथे येथील शासकीय रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या घटनेच्या निषेधार्थ मराठी पत्रकार परिषदेने आक्रमक पवित्रा घेत आरोपींवर मकोका (MCOCA) लावण्याची मागणी केली आहे.
काय घडले नेमके?
स्वाती हडकर आपल्या सहकाऱ्यांसह केतकी खाडी परिसरात बेकायदेशीर वाळू उत्खननाचे शूटिंग करण्यासाठी गेल्या होत्या. यावेळी दबा धरून बसलेल्या वाळू माफियांनी तीन गाड्यांमधून येऊन त्यांच्यावर हल्ला केला. हल्लेखोरांनी प्रथम स्वाती यांना शिवीगाळ करत मारहाण सुरू केली. त्यानंतर त्यांना आणि त्यांच्या सहकाऱ्यांना बेदम मारहाण केली. या हल्ल्यात स्वाती यांना गंभीर दुखापत झाली आहे.
पोलिस कारवाई आणि मराठी पत्रकार परिषदेची मागणी
या प्रकरणी चिपळूण पोलीस ठाण्यात मारहाण आणि विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे. दरम्यान, मराठी पत्रकार परिषदेने या हल्ल्याचा तीव्र निषेध नोंदवत वाळू माफियांवर कठोर कारवाईची मागणी केली आहे. परिषदेने आरोपींवर मकोका कायद्याअंतर्गत कारवाई करावी, अशी मागणी सरकारकडे केली आहे. उद्या मराठी पत्रकार परिषदेचे कोकण विभागीय उपाध्यक्ष हेमंत वणजु, मराठी पत्रकार परिषदेचे जिल्हाध्यक्ष आनंद तापेकर, कार्याध्यक्ष राजेश शेळके हे स्वाती हडकर यांची विचारपूस करण्यासाठी व त्यांच्यासोबत मराठी पत्रकार परिषद आहे हे सांगण्यासाठी चिपळूण येथे भेट देणार आहेत. त्यानंतर जिल्हा पोलीस अधीक्षक यांची भेट घेऊन संबंधित आरोपींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी करण्यात येणार आहे.
वाळू माफियांचा वाढता दबदबा
चिपळूण परिसरात बेकायदेशीर वाळू उत्खनन हा कायम चर्चेचा विषय राहिला आहे. यापूर्वीही अनेकदा वाळू माफियांकडून स्थानिक पत्रकार आणि कार्यकर्त्यांना धमक्या देण्याच्या घटना समोर आल्या आहेत. मात्र, या हल्ल्याने माफियांच्या बेलगाम कारवायांचा कळस गाठला आहे. पोलिसांनी तपास तीव्र केला असून, लवकरच आरोपींना अटक होण्याची शक्यता आहे. पत्रकारांच्या सुरक्षेसाठी सरकार आणि प्रशासनाकडून ठोस पावले उचलली जातील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.














