दापोली : विधानसभेतील मतदानावरून पाजपंढरीत दोन गटांत वाद

दापोली : तालुक्यातील पाजपंढरी येथे एका गटाने दुसऱ्या गटातील कार्यकर्त्याला मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिल्याची तक्रार दापोली पोलिसांत दाखल झाली आहे. दापोली विधानसभेची निवडणूक झाल्यानंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार संजय कदम यांनी शिवसेनेत पक्षप्रवेश करून योगेश कदम यांना सहकार्य करणार, असे जरी म्हटले असले तरी दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांचे मनोमिलन अद्याप झालेले नसल्याचे या घटनेवरून स्पष्ट झाले आहे.

याबाबत दापोली पोलिसातून मिळालेल्या माहितीनुसार, पाजपंढरी गावातील शेतवाडी मंडळाचे अध्यक्ष गणेश जनार्दन चोगले यांनी विधानसभा निवडणुकीतील मतदानावरून नीलकंठ रघुवीर यांच्या शर्टची कॉलर धरून त्यांना शिवीगाळ केली. त्यावेळी रघुवीर यांचे भाऊ त्यांना वाचवण्यासाठी गेले असता त्यांनाही मारहाण करून तुम्ही गावात राहायचे नाही, तुम्ही नाही ऐकलात तर तुम्हाला ठार मारून समुद्रात फेकून टाकू, अशी धमकी दिली. अशी तक्रार नीलकंठ हिऱ्या रघुवीर यांनी दिली असून, या तक्रारीवरून संशयित गणेश जनार्दन चोगले, अनिल गोपाळ चोगले, जितेंद्र सखाराम चोगले, विष्णू बाळ्या तबीब, वामन चाया चोगले, किसन जनार्दन चोगले (सर्व रा. पाजपंढरी, शेतवाडी) यांच्या विरोधात दापोली पोलिसांत गुन्हा दाखल झाला असून, अधिक तपास उपनिरीक्षक डी. डी. पवार करत आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:23 15-04-2025