रत्नागिरी : पतंजली परिवाराच्या योग शिबिराला प्रतिसाद

रत्नागिरी : अलीकडे व्यायामाचा अभाव, चुकीच्या आहारपद्धतीमुळे मधुमेह, कर्करोग, स्थूलपणा, जाडी, वजन वाढणे अशा आजारांनी माणूस ग्रस्त आहे. यावर एकच रामबाण उपाय म्हणजे दररोज दोन तास प्राणायाम, आसने आणि आहारावर नियंत्रण हवे.

पतंजली परिवारातर्फे मोफत मार्गदर्शन, नित्य योगकक्षा चालवल्या जात आहेत, त्याचा जास्तीत जास्त लोकांनी लाभ घेऊन राष्ट्र उभारणीत योगदान करावे, असे प्रतिपादन योगऋषि स्वामी रामदेवजी महाराज यांचे परमशिष्य तथा पतंजली योगपीठाचे (हरिद्वार) मुख्य केंद्रीय प्रभारी डॉ. पू. स्वामी परमार्थदेवजी यांनी केले.

पतंजली परिवारातर्फे प्रमोद महाजन क्रीडा संकुलमध्ये पाच दिवसीय निःशुल्क समन्वित (इंटिग्रेटेड) योग शिबिरात ते बोलत होते. आज १२५ अधिक जणांनी शिबिरात भाग घेतला. पतंजली योग समितीचे जिल्हा प्रभारी विद्यानंद जोग आणि विनय साने यांनी डॉ. परमार्थदेवजी यांचा सत्कार केला.आपल्या ऋषीमुनींनी योग, प्राणायाम व होमहवनाचे महत्त्व सांगितले. परंतु इंग्रजांनी घरातील अग्निहोत्र बंद केले. हरिद्वारला रामदेवजी महाराजांनी पतंजली योगपीठ स्थापन केले व योग चळवळ सुरू केली. त्यामुळे जगभरात योग दिन साजरा होऊ लागला, योग केल्यास निरोगी राहाल आणि आपली वृत्तीसुद्धा चांगली राहील. आपण कोणालाही फसवणार नाही. उत्तम पती, पत्नी, मुले, माता, पिता व देशभक्त होण्यासाठी योग करणे आवश्यकच आहे, असे डॉ. परमार्थदेवजी म्हणाले.

अलीकडे तरुणांचे हृदयविकाराने मृत्यू होत होत आहेत. किडनी फेल होत आहेत. रसना व वासनेवर नियंत्रण नाही. त्यावर नियंत्रण आणा. कपालभाती हजार वेळा करा, आहारावर नियंत्रण आणा. सूर्यनमस्कार, जोर- बैठका घाला. परमात्म्याची भक्ती करा, हीच युक्ती आहे. ज्याला जास्त आजार आहेत, त्यांनी सकाळ-संध्याकाळ योग करा. आई जन्म देते पण अनेक रोग जडल्यामुळे औषधे खाऊन कंटाळलेले, सर्व पैसा संपवलेले अनेक लोक हरिद्वारला येतात. पण नित्यनेमाने सलग नऊ महिने समर्पण भावनेने योग करा, दुसरा जन्म योगातून होईल, असे डॉ. परमार्थदेवजी यांनी सांगितले.

Infigo Eyecare

या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश सुनील गोसावी, दिवाणी न्यायाधीश (वरिष्ठ स्तर) बी. डी. तारे, भारत स्वाभिमान ट्रस्टचे राज्य प्रभारी (पश्चिम महाराष्ट्र) बापू पाडळकर, पतंजली महिला समितीच्या राज्य समन्वयक रमाताई जोग, विद्यानंद जोग, प्रशिक्षक अनंत आगाशे, विनय साने, सौ. नीता साने, अमृत पटेल, डॉ. पटेल, राजू गोरले, दिलीप कुलकर्णी, अरुण पाटील, मारुती अळकुटे, प्रणव जोग, श्री. खानविलकर, भारत सावंत, श्रीकांत ढालकर आदींसह पतंजली परिवारातील भारत स्वाभिमान न्यास, महिला पतंजली योग समिती, पतंजली किसान सेवा समिती, पतंजली योग समिती, युवा भारतचे पदाधिकारी उपस्थित होते.

प्रमोद महाजन क्रीडा संकुल येथे १५ एप्रिलला सकाळी ६ ते ७.३० या वेळेत डॉ. पू. स्वामी परमार्थदेवजी शिबिरात विविध आसने आणि प्राणायाम यासंबंधी प्रात्यक्षिकासह मार्गदर्शन करणार आहेत. यात सहभागी होण्यासाठी योगसाधकांनी येताना मॅट किंवा बैठक आणावी. जास्तीत जास्त लोकांनी सहभाग घ्यावा, असे आवाहन पतंजली परिवारातर्फे करण्यात आले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:23 15-04-2025