संगमेश्वर : बिबट्याच्या हल्लात गाईचा मृत्यू

देवरुख : संगमेश्वर तालुक्यातील उजगाव शेवरवाडी येथे शनिवारी भर दुपारी बिबट्याने एका गाईवर हल्ला करून तिला ठार केले. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.

गेल्या काही दिवसांपासून संगमेश्वर तालुक्यात बिबट्याचे प्रमाण वाढले आहे. बिबट्याने यापूर्वी अनेक पाळीव प्राणी, जसे की कुत्री आणि मांजरे यांचा बळी घेतला आहे. आता तर दिवसाढवळ्या बिबट्याचे दर्शन होत असल्याने नागरिक चांगलेच धास्तावले आहेत. उजगाव येथील शेतकरी संतोष गिजे यांच्या मालकीची गाय शनिवारी दुपारी बिबट्याच्या हल्ल्यात मारली गेली. या घटनेमुळे ग्रामस्थांमध्ये अधिकच दहशत निर्माण झाली आहे.

गावातील नागरिकांनी वनविभागाकडे तातडीने बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी केली आहे. बिबट्याच्या वाढत्या वावरामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असून, वनविभागाने यावर त्वरित उपाययोजना करावी, अशी मागणी जोर धरत आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:14 PM 15/Apr/2025