संगमेश्वर : रखडलेल्या कामामुळे सोनवी पुल बनतोय मृत्यूचा साफळा

संगमेश्वर : मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील संगमेश्वर येथील नवीन सोनवी पूलाच्या उभारणीचे काम गेली ४ वर्षे अत्यंत संथगतीने सुरु असून येथील ब्रिटिश कालीन पुलाला ९३ वर्षे पूर्ण झाली आहेत. मार्च २०२१ साली सुरु करण्यात आलेल्या नवीन पूलाच्या उभारणीचे काम चार वर्षे रखडले आहे. गेली अनेक वर्षे रखडलेल्या मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या पूर्णत्वाच्या नवनवीन तारखा न्यायालयाला सांगितल्या जात असतांना संगमेश्वरच्या दुतर्फा असणाऱ्या ३६ किमी लांबीच्या अपघात प्रवण क्षेत्रातील सोनवी पूलाचे काम रखडल्याने संगमेश्वर आणि माभळेवासीयांनी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली आहे.

सध्या सोवी पुलाचे काम करणाऱ्या ठेकेदार कंपनीने नियमबाह्यपणे रस्त्याची रुंदी कमी केली असून येथे वाहनांची तासंतास रखडपट्टी होत आहे. राष्ट्रीय महामार्ग विभागाचे अधिकारी याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असून येथे तयार करण्यात आलेल्या मृत्यूच्या सापळ्यात दुर्दैवाने काही घटीत घडल्यास याची सर्व जबाबदारी राष्ट्रीय महामार्ग विभाग आणि ठेकेदाराची असेल असा ईशारा प्रवासी संघटनेचे परशुराम पवार यांनी दिला आहे.

ब्रिटिश काळात १९३३ साली खांब उभारणी करीता काळ्या दगडांचा वापर करुन सोनवी पूलाची उभारणी करण्यात आली. या पूलामुळे संगमेश्वर आणि माभळे हे दोन गाव जोडले गेले. सोनवी पूलाच्या माभळे कडील बाजूला अवघड वळण असल्याने या परिसरात अनेकदा अपघात घडले आहेत. १९३३ साली पूलाच्या उभारणीनंतर असणारी अवजड वाहनांची आणि एकूणच वाहनांची संख्या आणि सध्या पूलावरुन होणारी वाहतूक यामध्ये खूप मोठी तफावत असल्याने सोनवी पूलाच्या सुरक्षेचा आणि मजबूतीचा प्रश्न अनेकवेळा उपस्थित करण्यात आला होता. पूलाच्या बाजूने उभारलेले संरक्षक कठडे अनेकदा तुटून पूलावर अपघात घडले आहेत. वाहनसंख्या वाढल्याने या पूलावर देखील अनेकदा अपघात घडले आहेत.

सोनवी पूलाला बारीक तडे गेल्याने हा पूल धोकादायक झाल्याची भिती माभळे संगमेश्वरवासीयांसह वाहनचालकांनी व्यक्त केली होती. मात्र राष्ट्रीय महामार्ग विभागाने पूलाची पहाणी करुन पूल सुरक्षित असल्याचा निर्वाळा दिला होता. सद्यस्थितीत ५० टन वजन घेऊन मालवाहतूक करणारे अवजड ट्रक सोनवी पूलावरुन जाताच पूलाला हादरे बसत असल्याने पादचारी या पूलावरुन जाता येता जीव मूठीत धरुन जात असतात. महामार्गाच्या चौपदरीकरणाची ज्यावेळी घोषणा होवून प्रत्यक्ष कामाचा प्रारंभ झाला त्यावेळी सोनवी पूलाला आता नवीन पर्यायी पूल मिळणार याची खात्री झाली. चौपदरीकरणाच्या कामाला १२ वर्षांपूर्वी सुरुवात झाली असली तरी नवीन सोनवी पूलाचे काम मार्च२०२१ साली हाती घेण्यात आले.

मार्च २०२१ साली मोठा गाजावाजा करुन नवीन सोनवी पूलाचे काम सुरु होताच वाहनचालकांसह सर्वांनीच सुटकेचा श्वास टाकला. मात्र तीन महिने काम झाल्यानंतर जून मध्ये बंद झालेले पूलाचे काम नंतर ९ महिने ठप्प होते. त्यानंतरही हे काम अधून मधून ठप्प होते आणि नंतर अत्यंत मंदगतीने सुरु आहे. सोनवी पुलाजवळच संगमेश्वरचे बसस्थानक आहे. पूल अरुंद असल्याने पूलाच्या दुतर्फा नेहमीच वाहतूक कोंडी होते. अर्धा अर्धा तास वाहने अडकून वाहनांच्या लांबच्यालांब रांगा लागतात. या सर्व अडचणी लक्षात घेता सोनवी पूलाचे काम वेगाने होणे अपेक्षित होते मात्र प्रत्यक्षात तसे होताना दिसत नाही. सध्या संगमेश्वर बसस्थानका बाहेर दोन पिलर्सचे काम सुरु आहे. यामुळे येथे केवळ एक वाहन जेमतेम जावू शकेल एवढाच मार्ग ठेवून राष्ट्रीय महामार्ग नियमबाह्य पद्धतीने रुंदीला कमी केला गेला आहे. यामुळे संगमेश्वर येथे दररोज तासंतास वाहतूक कोंडी होत असून वाहनचालक आणि पादचारी यांचा संयम सुटू लागला आहे. संगमेश्वरच्या तीन बाजुंना वाहनांच्या जवळपास एक किमी लांबीच्या रांगा लागत आहेत. याठिकाणी अन्य बाजूने तातडीने दुसरा मार्ग तयार करण्याची मागणी वाहनचालक, पादचारी आणि संगमेश्वरवासियांनी केली आहे.

ज्या ठिकाणी पिलर्सची कामं सुरु आहेत तेथे सुरक्षेची कोणतीही काळजी घेतली जात नाही. सारे काम बेदरकार आणि बेजबाबदारपणे सुरु आहे. याठिकाणी वाहनचालक, पादचारी यांचा कोणताही विचार केला गेलेला नाही, असे दिसून येते. याच ठिकाणी रस्त्याला मोठे खड्डे पडले असून यामुळे दुचाकीचे वारंवार अपघात घडत आहेत. चिपळूण टॅपचे वाहतूक पोलीस संगमेश्वरला येतात मात्र ते संगमेश्वर येथील वाहतूक कोंडी सोडविण्याचे आपले कर्तव्य न करता लोवले मार्गावर दररोज वाहनचालकांना अडविण्यात धन्यता मानत आहेत. यासर्व अन्यायाला संगमेश्वरवासीय कंटाळले असून संगमेश्वरचे धडाकेबाज पोलीस उपअधीक्षक शिवप्रसाद पारवे यांनीच यातून योग्य तो मार्ग काढून संगमेश्वरवासीयांची सूटका करावी अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:51 PM 15/Apr/2025