खेड, १७ एप्रिल २०२५: खेड येथील तहसीलदार कार्यालयासमोरील रस्त्यावर गटाराच्या सांडपाण्यात ताडगोळे धुणाऱ्या फेरीवाल्यावर भारतीय न्यायसंहिता २०२३ चे कलम २७१ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा किळसवाणा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने परप्रांतीय व्यावसायिक जनतेच्या आरोग्याशी खेळत असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
फिर्यादी तुषार रमेश ड़ॉड (खेड पोलिस ठाणे) यांच्या तक्रारीनुसार, आरोपी आलाउद्दीन कुदुस शेख (वय ६४, रा. बालुग्राम, ता. उधवा दियारा, जि. साहेबगंज, झारखंड) हा १६ एप्रिल २०२५ रोजी सकाळी ११:३० वाजता खेड बस स्टँड ते तीनबत्ती नाका रस्त्यालगत तहसीलदार कार्यालयासमोर हातगाडीवर ताडगोळे विक्रीसाठी ठेवत होता. यावेळी त्याने विक्रीसाठी आणलेले ताडगोळे रस्त्यालगतच्या गटाराच्या सांडपाण्यात धुतले. हे कृत्य मानवी आरोग्यास धोका निर्माण करणारे तसेच रोगांचा संसर्ग पसरवणारे असल्याने त्याच्याविरुद्ध कारवाई करण्यात आली आहे.
या घटनेची तक्रार खेड पोलिस ठाण्यात नोंदवण्यात आली असून, १६ एप्रिल २०२५ रोजी दुपारी २:४६ वाजता गु.र.नं. १०६/२०२५ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सोशल मीडियावर व्हायरल व्हिडीओ
सध्या उन्हाळ्याच्या काळात ताडगोळे, नारळ पाणी आणि थंड पेयांना मोठी मागणी आहे. परंतु, आरोपीच्या या बेजबाबदार कृत्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे. या घटनेमुळे खाद्यपदार्थांच्या स्वच्छतेबाबत प्रश्न उपस्थित झाले असून, स्थानिक प्रशासन आणि पोलिसांनी अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी कठोर कारवाईचे संकेत दिले आहेत.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:52 17-04-2025














