रत्नागिरी : सागरी महामार्गासाठी काळबादेवी येथे फ्लायओव्हर ब्रिज उभारण्याबाबतचा नवीन प्रस्ताव ठेवण्यात आला असून याबाबत (ता. १९) सायंकाळी पालकमंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत ग्रामस्थांबरोबर बैठक झाली. त्यामध्ये सकारात्मक चर्चा झाली असून पुढील कार्यवाही लवकरच करण्यात येणार आहे.
रेवस-रेड्डी सागरी महामार्ग काळबादेवी गावातून आरे-वारेपर्यंत नेण्यासाठी तीन पर्याय ठेवण्यात आले होते. त्यात काही ग्रामस्थांची घरे जाण्याची शक्यता होती. त्यामुळे ग्रामस्थांनी हा मार्ग किनाऱ्यावरील धूपपप्रतिबंधक बंधाऱ्याच्या जवळून पुढे आरे-वारेला जोडण्यात यावा अशी सूचना केली होती. त्यानुसार एमएसआरडीसीने सुधारित आखणी तयार करून महिन्याभरापुर्वी सर्वेही केले. मात्र त्या मार्गाला केंद्र सरकारकडून नाकारण्यात आला. त्यामुळे हे काम लवकरात लवकर व्हावे यासाठी पालकमंत्री उदय सामंत यांनी पुढाकार घेऊन काळबादेवी ग्रामस्थांची बैठक आयोजित केली होती. त्यामध्ये ग्रामस्थांची घरे वाचविण्यासाठी प्लायओव्हर ब्रिज बांधण्याबाबत प्रस्ताव बनविण्यात येणार असल्याचे मंत्री सामंत यांनी सांगितले. तसेच महामार्गाचे काम करताना एकाही ग्रामस्थांच्या घराला अडचण होणार नाही, याची काळजी घेतली जाईल असाही विश्वास त्यांनी दिला. या बैठकीत काही ग्रामस्थांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. तर काहींनी शंका उपस्थित केल्या. त्यांच्या प्रश्नांना उत्तरेही दिली गेली. तसेच काळबादेवी-मिऱ्या हा पूल वरळी सी ब्रिजप्रमाणे पर्यटकांसाठी आकर्षण ठरेल असा बनविण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
दरम्यान, ग्रामस्थांनी सुचविल्यानुसार काळबादेवी किनाऱ्यावरुन पाच किलोमीटर लांबीचा सागरी महामार्ग झाला असता तर, काळबादेवीचा गोवा येथील किनाऱ्याप्रमाणे पर्यटन विकास झाला असता अशी काही ग्रामस्थांची भूमिका होती. पीलर टाकून पुल उभाराल तर रोजगार मिळणार नाही, अशी ग्रामस्थांमध्ये चर्चा सुरू होती.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
09:43 AM 21/Apr/2025














