चिपळूण : ‘ग्रॅव्हिटी पाणी योजने’च्या भूसंपादनासाठी धामणवणे ग्रामपंचायतीत २३ एप्रिलला जनसुनावणी

चिपळूण : शहरासह परिसरातील गावांना प्रतीक्षा लागून असलेल्या ग्रॅव्हिटी पाणी योजनेसाठी लागणाऱ्या एक हेक्टर जागेच्या भूसंपादनसाठी २३ एप्रिलला सकाळी ११ वाजता तालुक्यातील धामणवणे ग्रामपंचायत कार्यालयात सार्वजनिक जनसुनावणी आयोजित केली आहे. येथील उपविभागीय अधिकारी आकाश लिगाडे यांच्या उपस्थितीत ही सुनावणी होणार आहे.

तब्बल २० वर्षांनंतर १५५ कोटी ८४ लाख रुपये खर्चाच्या या ग्रॅव्हिटी पाणी योजनेला मंजुरी मिळाली. या योजनेचे काम नाशिक येथील श्रमगाथा असोसिएशन मार्फत सुरू झाले आहे. कोळकेवाडी धरणाच्या १११.५० मीटर उंचीवर असलेल्या आऊटलेटमधून चिपळूण शहरासाठी थेट पाणी उचलले जाणार आहे. तेथून १६ किलोमीटर अंतराच्या पाईपलाईनद्वारे खेडर्डी येथील १०६ मीटर उंचीवर असलेल्या नियोजीत साठवण टाकीत हे पाणी आणले जाणार आहे. पुढे डीबीजे महाविद्यालय (६८.६० मीटर उंचीवर), पाग (७६.६७मीटर उंची), गुहागर बायपास (५६.३० मीटर उंची) व गोवळकोट येथील ५६.३० मीटर उंचीवर असलेल्या साठवण टाकीत एकाचवेळी ग्रॅव्हीटीने पाणी पुरवठा केला जाणार आहे. या साठवण टाक्यांमधून शहरातील सहा विभागांत पाणीपुरवठा केला जाणार आहे.

शहराच्या प्रत्येक भागात पाच ते सहा मजल्यांवर ग्रॅव्हिटी योजनेतील पाणीपुरवठ्याचे नियोजन आहे. कोळकेवाडी धरणापासून शहरात ७०० मिलिमीटरची पाईपलाईन टाकली जाणार आहे. तेथून पुढे ४०० व ३५० मिलिमीटर असणार आहे. उपविभागीय अधिकारी आकाश लिगाडे यांच्या मार्फत भूमिसंपादन प्रक्रिया सुरू केली आहे. त्यासाठी सार्वजनिक जनसुनावणी घेण्यात येणार आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:54 AM 21/Apr/2025