लांजा येथे सुसज्ज रुग्णालय उभे करणार : नीलेश सांबरे

लांजा : तालुक्यात सुसज्ज रुग्णालयाचा अभाव आहे आणि म्हणूनच लांजा-रत्नागिरी येथील रुग्णांना उपचारासाठी कोल्हापूर किंवा मुंबईला जायला लागू नये, त्यांना याच ठिकाणी उपचार मिळाले पाहिजेत, या दृष्टीने लवकरच या ठिकाणी सुसज्ज, असे रुग्णालय उभे करण्याचा मनोदय जिजाऊ शैक्षणिक सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष नीलेश सांबरे यांनी लांजा येथे व्यक्त केला.

जिजाऊ शैक्षणिक, सामाजिक संस्थेच्या वतीने लांजा येथे सुरू करण्यात आलेल्या कार्यालयाचे उद्घाटन कार्यक्रम लांजा येथे पार पडला. यावेळी सांबरे हे बोलत होते. जिजाऊ शैक्षणिक, सामाजिक संस्थेच्या वतीने लांजा येथे कार्यालयात सुरू करण्यात आले असून, त्या ठिकाणी महिला, तरुणवर्ग, मुली यांच्यासाठी विविध कोर्सेस मोफत उपलब्ध करून देण्यात आले आहेत. त्याचप्रमाणे सापुचेतळे येथे मोफत पोलिस भरती प्रशिक्षण केंद्रदेखील सुरू करण्यात आले आहे.

सांबरे म्हणाले की, गेल्या १६-१७वर्षांपासून जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या माध्यमातून आपण काम करत आहोत. आपला कोकणी माणूस जो सर्वचदृष्टीने आर्थिक, सामाजिक, राजकीय पुढे गेला आहे तो आपल्या समाजाला पुढे नेत नाही ही खंत आहे आणि म्हणूनच तुम्हा-आम्हाला, आपल्या प्रत्येक माणसाला पुढे घेऊन जायचे आहे. मी जिल्ह्यात फिरत असताना पाहिले आहे या ठिकाणी सुसज्ज रुग्णालयाचा अभाव आहे. त्यामुळे येथील गोरगरीब रुग्णांसह सर्व रुग्णांना उपचारासाठी कोल्हापूर किंवा मुंबई येथे धाव घ्यावी लागते. आपल्याला हे सारे चित्र बदलायचे आहे. याच ठिकाणी कोल्हापूर, मुंबई दर्जाची आरोग्यसुविधा मिळावी, यादृष्टीने मी अशी व्यवस्था करणार आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:29 PM 25/Apr/2025

Arihant 2