गुहागर : रखडलेले काम सुरू न झाल्यास जलजीवनविरोधात ग्रामस्थांचा एल्गार

गुहागर : गेली दीड वर्षे रखडलेल्या जलजीवनच्या कामामुळे संतप्त झालेल्या साखरीआगर येथील ग्रामस्थांनी सरपंचांसह गुहागर पंचायत समितीवर धडक दिली. आठ दिवसांत या जलजीवन योजनेचे काम सुरू न झाल्यास गुहागर पंचायत समितीवर हंडा मोर्चा आणण्याचा इशारा दिला आहे.

गुहागर तालुक्यातील साखरीआगर येथील जलजीवन पाणीयोजनेचे काम दोन वर्षापूर्वी सुरू झाले. आतापर्यंत ३५ टक्के काम पूर्ण झाले आहे; मात्र त्यानंतर ठेकेदाराने पूर्णतः दांडी मारली आहे. या पार्श्वभूमीवर साखरी आगर येथील सरपंच दुर्वा पाटील, उपसरपंच सुदाम आंबेकर, रवींद्र पवार, मारुती होडेकर, सुरेश कदम, दीपक पाटील, मधुकर पाटील, विजय भूते आदींनी गुहागर पंचायत समितीमध्ये गटविकास अधिकारी शेखर भिलारे यांची भेट घेऊन याबाबत तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली. येत्या आठ दिवसांत सदर योजनेचे काम सुरू न झाल्यास गुहागर पंचायत समितीवर सर्व ग्रामस्थांसमवेत हंडा मोर्चा आणण्याचा इशारा दिला आहे.

यावेळी सरपंच पाटील यांनी ठेकेदार पुढील काम पूर्ण करण्याकरिता कोणतेच उत्तर देत नाही. आज गावातील पाणीसमस्या नसली तरी विहिरीवरून हंडेच्या हंडे घेऊन जाताना महिला दिसून येत आहेत. यामुळे पाण्याचे हाल महिलांना सर्वाधिक सोसावे लागत आहेत. अशा स्थितीत जलजीवन योजनेकरिता ग्रामस्थांनी प्रामसहभाग दिला असून, आता ही योजना पूर्ण करण्याकरिता ग्रामपंचायतीकडे विचारणा करत आहेत.

साखरीआगर येथील ग्रामस्थ आपल्याकडे आले होते. जलजीवनचे काम अर्धवट स्थितीत आहे, ही वस्तुस्थिती आहे. याबाबत आपण संबंधित ठेकेदाराजवळ संपर्क साधून काम लवकरात लवकर सुरू करण्याच्या सूचना देणार आहोत ठेकेदाराने काम करण्यास दिरंगाई केली तर त्याला काळ्या यादीत टाकून त्याबदली दुसरा ठेकेदार देऊन ते काम पूर्ण करण्याचा आपण पुरेपूर प्रयत्न करू- शेखर भिलारे, गटविकास अधिकारी

पाईपमध्ये माती अन् उंदीर
दरम्यान, टाकलेल्या पाईपचे तोंड बंद न झाल्याने त्या पाईपमध्ये माती व उंदीर असे अनेक प्राणी जाऊन बसले असून, ही पाईपलाईन चोकअप होण्याची शक्यता आहे तर संबंधित ठेकेदार आमचे कोणाचेच फोन उचलत नाहीत. यामुळे येत्या आठ दिवसांत काम सुरू न झाल्यास सर्व ग्रामस्थांनी हंडा मोर्चा आणण्याचा निर्णय घेतला असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:45 AM 29/Apr/2025