चिपळूण : चिपळूण नगर परिषदेच्या वाचू आनंदाने या उपक्रमाला दिवसेंदिवस वाढता प्रतिसाद मिळत आहे. रविवार दिनांक २७ एप्रिल रोजी चिपळूण शहरातील नव्याने सुशोभित झालेल्या नारायण तलावाच्या परिसरात वाचू आनंदाने हा उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमाचा हा चौथा रविवार होता.
विद्यार्थ्यांना वाचनाची गोडी लागावी, यासाठी चिपळूण नगर परिषदेने वाचू आनंदाने हा उपक्रम आयोजित केला आहे. या उपक्रमांतर्गत दर रविवारी शहरातील निसर्गाच्या ठिकाणी विद्यार्थी, नागरिक एकत्र येतात. लोकमान्य टिळक स्मारक वाचनालय व डॉ. बाबासाहेव आंबेडकर वाचनालयाच्यावतीने पुस्तके उपलब्ध करून दिली जातात.
आपल्याला हवं ते पुस्तक घ्यायचे आणि दोन तास निसर्गाच्या सानिध्यात मनसोक्त वाचायचं, अशी ही संकल्पना मुख्याधिकारी विशाल भोसले यांची आहे.
दिनांक २७ रोजीचा रविवार हा चौथा रविवार होता. शहरातील नारायण तलाव परिसरात मोठ्या संख्येने वाचक उपस्थित होते. मुख्याधिकारी विशाल भोसले, डीबीजे महाविद्यालयाच्या इंग्रजी विभागाच्या प्रमुख डॉ. शिल्पा सप्रे, कैसर देसाई, सीए अमित ओक, समीर कोवळे, प्रशासकीय अधिकारी मंगेश पेढांबकर, उद्यान विभागप्रमुख बापू साडविलकर, लोकमान्य टिळक वाचनालयाचे संचालक श्री. ओक, उद्योजक राम रेडीज, ग्लोबल चिपळूण टुरिझमचे विश्वास पाटील, ज्येष्ठ साहित्यिक प्रकाश देशपांडे, सुनिल खेडेकर आदींनीही या उपक्रमाला हजेरी लावली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राची जोशी यांनी केले. येत्या रविवारी खेड येथील हवेली येथे हा उपक्रम राबविण्यात येणार आहे, अशी घोषणा यावेळी प्रशासकीय अधिकारी मंगेश पेढांबकर यांनी केली. डॉ. आंबडेकर वाचनालयाचे संचालक प्रदीप पवार यांनी मानले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:07 AM 02/May/2025














