खेड : अतिक्रमण विरोधातील समिती कागदावरच

खेड : नगरपरिषद हद्दीतील मोक्याच्या शासकीय जागा हेरुन त्याठिकाणी अनधिकृतपणे खोके उभारण्याचा सपाटा अद्यापही थांबलेला नाही. नगर प्रशासन अतिक्रमण विरोधातील कारवाईबाबत अजूनही सुस्तच आहे. यासाठी आठ महिन्यापूर्वी स्थापन करण्यात आलेली समितीही कागदावरच राहिली आहे.

यामुळे अनधिकृत खोक्यांवर नगर प्रशासनाकडून कारवाईची शक्यता धूसर बनली आहे. नगर प्रशासनाची कोणतीही परवानगी न घेता खोके उभारण्याचा प्रकार सुरू असल्याने शहर अनधिकृत खोक्यांचे ‘माहेरघर’ बनले आहे. नगरपरिषद हद्दीत अनधिकृत खोके उभे करत दुकानेही थाटली आहेत. नगर प्रशासनाने ८ महिन्यापूर्वी अनधिकृत खोक्यांवर कारवाईसाठी समिती नेमली होती. कायदेशीर बाबींच्या पूर्ततेचे कामही सुरू केल्याचे मुख्याधिकाऱ्यांनी स्पष्ट केले होते. मात्र आठ महिने लोटून देखील गठित समिती अन् कारवाई कागदावरच राहिली आहे.

नगर प्रशासनाचा धाकच उरला नसल्याने रातोरात अनधिकृत खोके उभे रहात आहेत. आता केवळ नगरपरिषद कार्यालयालगतच्या मोकळ्या जागाच शिल्लक राहिल्या आहेत. काही दिवसांनी येथेही अनधिकृत खोक्यांची उभारणी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. नगर परिषदेच्या मालकीच्या शासकीय जागांवर अनधिकृत खोके उभारण्याची परवानगी देतो कोण, नेमका वरदहस्त कोणाचा, या आणि अशा प्रश्नांचा नागरिकांकडून भडीमार केला जात आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:39 AM 02/May/2025