रत्नागिरी : नाचणे ग्रामपंचायतीतर्फे चौथ्या वर्षी उन्हाळी छंद वर्ग

रत्नागिरी : नाचणे (ता. रत्नागिरी) ग्रामपंचायतीने सलग चौथ्या वर्षी उन्हाळी छंद वर्ग (समर कॅम्प) आयोजित केला आहे. अशा तऱ्हेने छंद वर्ग आयोजित करणारी ही महाराष्ट्रातील पहिली ग्रामपंचायत आणि रत्नागिरी जिल्हा परिषदेची पहिली मराठी शाळा ठरली आहे.

नाचणे ग्रामपंचायत आणि जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा क्र. १ यांच्या गेली तीन वर्षे समर कॅम्प आयोजित केला जात आहे. सलग चौथ्यावर्षी येत्या ३ आणि ४ मे रोजी कॅम्पचे आयोजन करण्यात आले आहे.

मनोरंजन, कला, आरोग्य व सुसंस्कारांसह विद्यार्थ्यांच्या कला गुणांना वाव देण्यासाठी या दोन दिवसीय कॅम्पचे आयोजन करण्यात आले आहे. हा वर्ग ४ ते १२ वर्षे वयोगटातील मुलांसाठी आहे. प्रवेश विनामूल्य असून ३ आणि ४ मे रोजी सकाळी साडेसात ते साडेअकरा या वेळेत हा वर्ग होणार आहे.

शिबिरात मुंबई व रत्नागिरीतील नामवंत कलाकार मार्गदर्शन करणार आहेत. त्यामध्ये झुंबा, योगासने, जादूचे प्रयोग, ओरिगामी, क्राफ्ट, मनोरंजक खेळ, पक्ष्यांचे आवाज, फेस पेंटिंग, आजीआजोबांच्या गोष्टी, बोला बिनधास्त, बालगीते, बडबडगीते, रेकॉर्ड डान्सबाबत प्रात्यक्षिक आणि मार्गदर्शन केले जाणार आहे.

रत्नागिरी शहर आणि परिसरातील मुलांनी या छंद वर्गाचा लाभ घेण्याचे आवाहन सरपंच ऋषिकेश भोंगले, उपसरपंच निलेखा नाईक, सदस्य शुभम सावंत, शरदिनी मुळ्ये, दीपक नागवेकर यांनी केले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
16:01 02-05-2025