मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ११ मे रोजी सिंधुदुर्ग दौऱ्यावर

कणकवली : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे ११ मे रोजी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर येणार आहेत. या दौऱ्यात मालवण-राजकोट किल्ल्यावर उभारलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची पाहणी करणार आहेत. त्यानंतर दुपारी करंजे येथील कै. तातू सिताराम राणे ट्रस्ट संचलित गोवर्धन गोशाळेचे उद्घाटन करणार आहेत.

छत्रपती शिवरायांच्या पुतळा उभारणी कामास बांधकाम विभागाने ३१ कोटी ७५ लाख रकमेस प्रशासकीय मान्यता दिली आहे. त्यानुसार या विभागाने या कामाची निविदा प्रक्रिया पूर्ण करून राम सुतार आर्टस् क्रिएशन्स प्रा. लि. या कंपनीस कामाचे कार्यादेश निर्गमीत केले आहेत. पुतळा उभारणीचे काम ईपीसी तत्त्वावर झाले आहे.

तलवारधारी पुतळ्याची उंची ६० फूट इतकी असून संपूर्ण पुतळा ब्रांझ धातूमध्ये उभारला आहे. पुतळ्याच्या आधारासाठी स्टेनलेस स्टील सपोर्ट फ्रेमवर्क करण्यात आले आहे. तसेच चौथऱ्यासाठी एम ५० या उच्च दर्जाचे काँक्रीट व स्टेनलेस स्टील सळईचा वापर करण्यात आला आहे. या पुतळ्याचे संकल्पन आयआयटी मुंबईतील तज्ज्ञ संस्थेकडून तपासून घेण्यात आले आहे.

अनावरण नाही दर्शन
राजकोटवरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण नौदल दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मोठा गाजावाजा करून झाले होते; मात्र हा पुतळा कोसळल्यानंतर नरेंद्र मोदी आणि भाजपवर जोरदार टीका झाली होती. अशा परिस्थितीत हा पुतळा पुन्हा युद्धपातळीवर उभारण्यात आला. त्याच्या मजबुतीकडे पूर्णपणाने लक्ष देण्यात आले आहे. या पुतळ्याचे अनावरण न करता केवळ मुख्यमंत्र्यांनी दर्शन घेण्याचा निर्णय घेतला आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:42 PM 05/May/2025