राजापुरात प्रवासी निवारा शेड मंजूर

राजापूर : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरण वेगाने केले जात आहे; मात्र महामार्गावरील अनेक ठिकाणच्या थांब्यावर पिकअपशेड उभारण्यात आलेल्या नसल्याने प्रवाशांना एसटीसह वाहनांच्या प्रतीक्षेसाठी ऊन-पावसाच्या झळा सहन करीत रस्त्यावर उभे रहावे लागत आहे. प्रवाशांची होणारी गैरसोय लक्षात घेऊन उन्हाळे गंगातीर्थ येथील ग्रामस्थांनी भाजप पदाधिकाऱ्यांसमवेत छेडलेले आंदोलनाची दखल घेत भाजपचे नेते आणि माजी खासदार नीलेश राणे यांनी शासनाकडे महामार्गावर पिकअपशेड उभाराव्यात, अशी मागणी करीत सातत्याने पाठपुरावाही केला. त्याला अखेर यश येताना मुंबई-गोवा महामार्गावर पिकअपशेड मंजूर झाल्या आहेत. त्यामध्ये राजापूर तालुक्यातील सात पिकअपशेडचा समावेश आहे.

पिकअपशेड उभारणीच्या मागणीसाठी उन्हाळे गंगातीर्थ येथील ग्रामस्थांसमवेत छेडण्यात आलेले आंदोलन आणि माजी खासदार राणे यांच्या विशेष प्रयत्नांमुळे मुंबई-गोवा महामार्गावर प्रवाशांसाठी निवारा वा पिकअपशेड मंजूर झाल्याची माहिती भाजयुमोचे तालुकाध्यक्ष अरविंद लांजेकर यांनी दिली. मंजूर झालेल्या पिकअपशेड उभारण्याच्या प्रत्यक्ष बांधकामाला लवकरच प्रारंभ होणार असल्याचेही लांजेकर यांनी यावेळी स्पष्ट केले. यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता शिवणेवार, कुमावत यांचेही सहकार्य लाभल्याचे लांजेकर यांनी सांगितले.

मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम करताना रस्त्याच्या दुतर्फा असलेले मोठमोठे वृक्ष तोडण्यात आले आहेत. अनेक ठिकाणचे प्रवासी निवाराशेडही तोडण्यात आल्या. सध्या काम जोरात सुरू असल्यामुळे त्या ठिकाणी अद्यापही निवारा शेड उभारलेल्या नाहीत.

भाजपचे ज्येष्ठ पदाधिकारी अभिजीत गुरव, लांजेकर यांच्यासमवेत बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना घेरावही घातला होता. त्याची दखल माजी खासदार राणे यांनी घेत निवाराशेड उभारण्यासाठी शासनाकडे सातत्याने पाठपुरावा केला होता. त्याला अखेर यश येत राजापुरमध्ये उन्हाळे-गंगातीर्थ, उन्हाळे-आग्रेवाडी, शासकीय विश्रामगृह राजापूर, हातिवले, मारुती मंदिर (हातिवले), कोंड्ये, पन्हळे, टाकेवाडी, काझीवाडी, कोंडीवळे, खरवते आदी ठिकाणी पिकअपशेड मंजूर झाल्या असून त्याच्या बांधकामाची निविदा प्रक्रीयाही पूर्ण झाली आहे, अशी माहिती लांजेकर यांनी दिली.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:56 PM 10/Oct/2024