गुहागरात जलजीवन योजनेचा बोजवारा; आक्रमक भूमिका घेण्याचा मनसेचा इशारा

गुहागर : शासनाकडून एक महत्त्वाकांक्षी योजना म्हणून राबवली जात असलेल्या जलजीवन योजनेचा तालुक्यातील अनेक ठिकाणी बोजवारा उडाल्याचे दिसून येत आहे. वारंवार याबाबत पत्रव्यवहार करूनही परिस्थिती जैसे थे असल्याने गुहागर विधानसभा क्षेत्र उपजिल्हाध्यक्ष विनोद जानवळकर यांनी मनसे आक्रमक भूमिका धारण करेल, असा इशारा प्रशासनाला दिला आहे.

प्रशासनाला दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, शासनाची जलजीवन योजना अद्याप जिथेच्या तिथेच आहे. गुहागर तालुक्यात बहुतांशी ठिकाणची कामे अपूर्णच आहेत. या विषयासंबंधीत पाणीपुरवठा अधिकाऱ्यांकडे आम्ही पत्रव्यवहार केला होता. मात्र, अद्याप कार्यवाही झालेली नाही. जनतेच्या पत्रव्यवहारांकडे प्रशासनाकडून कानाडोळा केला जात आहे.

या योजनेच्या ठेकेदारांवर आपण कोणती कार्यवाही केली याची माहिती मिळावी. तसेच ठेकेदारांनी फक्त पाईप टाकून कामाची बिले काढून घेतली. परंतु काम अर्धवट स्थितीत आहे. तसेच ठेकेदारांनी टाकलेली पाईपलाईन तशीच पडून राहते आणि शासनाचा खर्च वाया जातो. त्यामुळे ठेकेदारांनी पाण्याचा स्त्रोत तपासणे गरजेचे आहे. तालुक्यात अनेक ठिकाणी अशीच स्थिती आहे. याप्रकरणी संबंधित यंत्रणेने वेळेत लक्ष न दिल्यास मनसे आक्रमक भूमिका घेईल, असा इशाराही गुहागर विधानसभा क्षेत्र उपजिल्हाध्यक्ष विनोद जानवळकर यांनी दिलेल्या निवेदनातून देण्यात आला आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:59 AM 06/May/2025