साडवली, 05 मे 2025 : संगमेश्वर तालुक्यातील देवधामापूर येथील लता राजाराम लिंगायत यांनी वयाच्या 52 व्या वर्षी 12 वीची परीक्षा उत्तीर्ण करून 61 टक्के गुण मिळवले आहेत. त्यांच्या या यशाबद्दल सर्वत्र कौतुकाचा वर्षाव होत आहे. जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर त्यांनी हे यश संपादन केले आहे.
लता लिंगायत या धामापूर तर्फे देवरुख येथील अंगणवाडीमध्ये अंगणवाडी सेविका म्हणून कार्यरत आहेत. सासरचे नाव लता विजय देवधरकर असे आहे. त्यांनी नोकरी आणि कौटुंबिक जबाबदाऱ्यांसोबतच शिक्षणाची ओढ पूर्ण करण्याचा निर्णय घेतला. दहावीनंतर पुढील शिक्षणाची इच्छा होती, पण नोकरी आणि कौटुंबिक जबाबदाऱ्यांमुळे शिक्षणासाठी वेळ काढणे कठीण होते. वय वाढत असतानाही त्यांची शिक्षणाची आवड कमी झाली नाही. अखेर 2024-25 या शैक्षणिक वर्षात त्यांनी 12 वीची परीक्षा देण्याचा ठाम निर्णय घेतला.
जिद्दीने मिळवले यश : लता यांनी नोकरी आणि घरच्या जबाबदाऱ्यांतून वेळ काढून अभ्यासासाठी मेहनत घेतली. 30-35 वर्षांनंतर पुन्हा शिक्षणाच्या प्रवाहात येऊन त्यांनी 61 टक्के गुण मिळवले.
वयाच्या पन्नाशीत आणि अनेक जबाबदाऱ्या सांभाळताना शिक्षण पूर्ण करणे सोपे नाही. तरीही लता यांनी दाखवलेली जिद्द आणि चिकाटी सर्वांसाठी प्रेरणादायी आहे. त्यांच्या यशाने अंगणवाडी कर्मचारी आणि गावकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. लता यांनी सिद्ध केले की, शिक्षणाला वयाची मर्यादा नसते आणि मेहनतीने कोणतेही ध्येय साध्य करता येते. त्यांच्या या यशाबद्दल गावकऱ्यांनी आणि सहकाऱ्यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:29 PM 06/May/2025














