चिपळूण : बहादूरशेखनाका येथे तीन वाहनांच्या अपघातात कारचे नुकसान

चिपळूण : मुंबई-गोवा महामार्गावरील बहादूरशेखनाका येथे मंगळवारी सकाळी ११:३० वाजता झालेल्या तीन वाहनांच्या अपघातात कारचे मोठे नुकसान झाले. या अपघात प्रकरणी ट्रक चालकावर गुन्हा दाखल केला आहे. या अपघात दरम्यान बहादरशेखनाका येथे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती. त्यामुळे वाहतूक विभागाच्या पोलिसांना मोठी कसरत करावी लागली.

कोल्हापूरहून माणगांवकडे निघालेला १४ चाकी ट्रक शहरातील बहादूरशेखनाका येथे वळवत असतानाच त्याची हुंडाई आयटेन गाडीला धडक बसली. त्याचवेळी कारच्या पलिकडच्या बाजूने सचिन कामेरकर (खंडचौकी) हा नगर परिषदेची कचरा गाडी घेऊन निघाला होता. मात्र या कचरागाडीची देखील कारला धडक बसली. त्यामुळे कारचे दोन्ही बाजूचे दरवाजे, आरसे, इतर भागाचे नुकसान झाले आहे. या घटनेची फिर्याद कार चालक दत्ताराम गणवत वाघे (६२, निरव्हाळ चिपळूण) यांनी दिली आहे.

त्यानुसार ट्रक चालक शेरसिंग कल्याणसिंग खैरय्या (३०, अमरावत रायशेर, मध्यप्रदेश) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. या अपघातामुळे मुंबई गोवा महामार्गासह गुहागर-विजापूर मार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाली होती. बऱ्याचवेळी वाहतूक कोंडी झाल्याने दोन्ही मार्गावर वाहनांची मोठी रांग लागली होती.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:38 AM 07/May/2025