चिपळूण : चिपळूण सायकलिंग क्लबतर्फे आयोजित किंग ऑफ कुंभार्ली ही देशभरातील ख्यातनाम सायकल स्पर्धा मोठ्या दिमाखात पार पडली. अल्पावधीतच प्रसिद्धीचे शिखर गाठलेल्या या सायकलिंग स्पर्धेचे हे चौथे वर्ष होते. स्पर्धेत खुल्या गटात सिद्धेश पाटील विजेता ठरला.
देशविदेशातून ३५० हून अधिक पाच गटांच्या या स्पर्धेत सायकलपटूंनी या स्पर्धेसाठी नोंदणी केली होती. यावर्षी प्रथमच ८ शिवछत्रपती पुरस्कारप्राप्त सायकलपटू, ३३ राज्य/राष्ट्रीय खेळाडू, १५ हून अधिक आयर्नमन, ५ आशिया चॅम्पियनशिप खेळलेले खेळाडू स्पर्धेत सहभागी झाले होते.
चिपळूणचे मुख्याधिकारी विशाल भोसले यांच्या हस्ते झेंडा दाखवून डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकातून सर्व सायकलपटू कुंभार्ली घाटमाथ्याच्या दिशेने रवाना झाले. रस्त्याच्या दुतर्फा नागरिकांनी टाळ्या वाजवून सायकलस्वारांना प्रोत्साहित केले. हौशी ढोलपथकांच्या तालावर सायकलस्वारांनी पोफळीपर्यंत अत्यंत वेगाने मार्गक्रमणा केली. एकमेकांच्या पुढे जाण्यासाठी लागलेल्या चुरशीने उपस्थितांच्या नजरेचे पारणे फेडले. पोफळी कमानीपासून सायकलपटूंचा कस बघणारी चढाई सुरू झाली आणि आत्तापर्यंत थोडे मागे थांबून आपली ऊर्जा राखलेल्या सायकलस्वारांनी बघता बघता त्या जत्थ्यातून आपल्या सायकली पुढे दामटल्या आणि इतर स्पर्धकांवर निर्विवादपणे वर्चस्व मिळविले.
बारा किमी खडी चढण असलेल्या कुंभार्ली घाटासाठी पुढे असणाऱ्या मोजक्या सायकलस्वारांमधेदेखील किंग ऑफ माउंटन या पारितोषिकासाठी चढाओढ होती. या संपूर्ण २९ किमीसाठी सुमारे ७५० मीटर्सपेक्षा जास्त उंची गाठत या सायकलस्वारांनी हे आव्हान यशस्वीपणे पेलले आणि हेही पारितोषिक पटकावले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:52 PM 07/May/2025














