Donald Trump : व्यापारबंदीचा इशारा दिल्यामुळे भारत-पाकिस्तानमध्ये शस्त्रसंधी; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा

नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तानने जर शस्त्रसंधी केली नाही तर आम्ही कोणताही व्यापार करणार नाही. जर या दोन्ही देशानी माघार घेतली तर आम्ही व्यापारात वाढ करू असा इशारा दिल्यानंतर भारत आणि पाकिस्तानने शस्त्रसंधी केल्याचा दावा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केला.

या दोन्ही देशामध्ये तणाव कमी झाल्यामुळे अणुयुद्धाचा धोका टळला आणि कोट्यवधी लोकांचा जीव वाचला असल्याचंही ट्रम्प म्हणाले.

Donald Trump Claim On India Pakistan Ceasefire : भारत-पाकिस्तानला व्यापारबंदीचा इशारा

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, “शनिवारी माझ्या प्रशासनाने भारत आणि पाकिस्तानमध्ये तात्काळ युद्धविराम घडवून आणण्यास मदत केली. मला वाटते की ही कायमस्वरूपी युद्धविराम असेल. भारत आणि पाकिस्तानचे नेतृत्व युद्धासाठी ठाम होते. मी म्हणालो की जर तुम्ही युद्ध थांबवले नाही तर आम्ही व्यापार करणार नाही.”

या आधीही अमेरिकेच्या डोनाल्ड ट्रम्प यांनी हाच दावा केला होता. पहलगाम हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानला प्रत्युत्तर देत नऊ ठिकाणी हल्ले केले आणि दहशतवादी अड्डे उद्ध्वस्त केले. त्यानंतर या दोन्ही देशांमध्ये तणाव वाढला. याचवेळी अमेरिकेने मध्यस्ती केल्यानंतर या दोन्ही देशांमध्ये शस्त्रसंधी झाल्याचा दावा ट्रम्प यांनी केला होता. त्यांनी तसे ट्वीट केलं होतं.

Donald Trump Claim : डोनाल्ड ट्रम्प यांच्या दाव्याचे भारताने खंडन केले

भारत आणि पाकिस्तानमधील युद्धबंदीचे श्रेय घेण्याच्या शर्यतीत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा मोठा दावा केला. त्यांनी दावा केला की दोन्ही देश अणुशक्ती आहेत. माझ्या प्रशासनाने दोन्ही देशांमध्ये युद्धबंदी आणण्यास मदत केली. अमेरिकेचा दावा भारताकडून खोडून काढण्यात आला.

अण्वस्त्रे वापरणे हे भारताचे कधीही उद्दिष्ट नव्हते. यावेळी आमचे लष्करी उद्दिष्ट फक्त 9 दहशतवादी अड्ड्यांवर हल्ला करण्याचे होते. ती आम्ही साध्य केली. युद्धबंदीमध्ये अमेरिकेची कोणतीही भूमिका नव्हती. जर तुम्ही थांबलात तर आम्ही थांबू, या पाक डीजीएमओच्या विनंतीला भारताने सहमती दर्शवली.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:03 13-05-2025