खेड : तालुक्यातील लोटे औद्योगिक वसाहतीतील सीईटीपीतून करंबवणे खाडीत सोडण्यात येत असलेल्या सांडपाण्याची पाईपलाईन बदलण्याचे पहिल्या टप्प्यातील काम आता पूर्णत्वाच्या मार्गावर आहे. जीर्ण झालेली ही पाईपलाईन ग्रामस्थांच्या मागणीनुसार तब्बल वीस वर्षांनी बदलून नव्याने टाकण्यात येत आहे. पहिल्या टप्प्यात सुमारे तेराशे मीटरी पाईपलाईन बदलण्यात आली असून पुढील टप्प्यातील काम पावसाळ्यानंतर केले जाणार आहे.
लोटे औद्योगिक वसाहतीतील उद्योगांचे रासायनिक सांडपाणी सीईटीपीमध्ये घेऊन त्यावर प्रक्रिया केली जाते. या प्रकल्पातील प्रक्रियेनंतर ते सांडपाणी ६३० मि.मी. व्यासाच्या एच.डी.पी.ई. पाईपलाईनमधून लोटे ते करंबवणे खाडीत सोडले जाते. त्यासाठी सुमारे साडेसात कि.मी.ची पाईपलाईन टाकण्यात आली आहे. साधारणपणे वीस वर्षांपूर्वी टाकण्यात आलेली ही पाईपलाईन सांडपाण्यामुळे आता जीर्ण झालेली आहे. अलिकडच्या काळात ही पाईपलाईन ठिक-ठिकाणी फुटत होती. तसेच गळतीही लागत होती. परिणामी सांडपाणी वाहून गेल्यानंतर स्थनिकांकडून तक्रारी येत होत्या. पाईपलाईन दुरूस्तीमध्येही वेळ जात होता. प्रसंगी पाईपलाईन नादुरूस्त झाल्यानंतर तिच्या दुरूस्तीसाठी एमआयडीसीला ‘शट डाऊन घ्यावे लागत होते. यामध्ये उद्योजकांना नुकसानीला सामोरे जावे लागत होते. परिणामी सांडपाणी पाईपलाईन बदलण्याची मागणी स्थानिकांसह उद्योजकांतूनही केली जात होती.
त्यामुळे एमआयडीसीने पाईपलाईन बदलण्याचा प्रस्ताव तयार केला. त्यातून अडीच कि.मी. लांबी पाईपलाईन बदलण्याचे काम मंजूर झाले. गेल्या वर्षभरापासून काम सुरू आहे. तसे पाहिले तर हे काम कठीण आणि तितकेच जिकरीचे असतानाही पहिला टप्पा आता पूर्णत्वाच्या मार्गावर आहे. साधारणपणे पहिल्या टप्प्यात सुमारे तेराशे मीटरची पाईपलाईन बदलण्याचे काम आता अंतिम टप्प्यात येत आहे. तर उर्वरीत पाईपलाईन बदलण्याचे काम आता पावसाळ्यानंतर हाती घेतले जाणार आहे. पाईपलाईन बदलून नव्याने टाकण्यात येत असल्याने आता बऱ्याचशा समस्या मिटणार आहेत.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:17 AM 14/May/2025












