मंडणगडातील गर्भवती महिला मृत्युप्रकरणी उच्चस्तरीय चौकशी

मंडणगड : तालुक्यातील कुडूक बुद्रुक येथील गर्भवती महिलेच्या मृत्युप्रकरणी आरोग्य यंत्रणेने अक्षम्य दुर्लक्ष केल्यानेच उपचारास विलंब झाल्याने महिलेवर अकाली मृत्यू ओढवल्याची भावना तालुक्यात निर्माण झाली आहे. या जनभावनेच्या पार्श्वभूमीवर आरोग्य उपसंचालक, सहायक जिल्हा शल्यचिकित्सक, जिल्हा वैद्यकीय अधिकारी या स्तरावरील अधिकारी गेल्या दोन दिवसांपासून तालुक्यात दाखल झाले असून महिलेच्या मृत्यूनंतर तालुक्यात डेरेदाखल झालेल्या अधिकाऱ्यांकडून या संदर्भात उच्चस्तरीय चौकशी पूर्ण केली आहे.

या घटनेशी संबंधित सर्व अधिकारी व कर्मचारी यांचे जाव नोंदविण्यात आले आहे व लवकर आरोग्य विभाग या संदर्भात जाहीर प्रकटनही देणार असल्याची माहिती पुढे आलेली आहे.

या संदर्भात तालुका वैद्यकीय अधिकारी अभिषेक गावंडे यांनी १३ मे २०२५ रोजी माध्यमांशी साधलेल्या संवादातील माहितीनुसार या विषया संदर्भात वरिष्ठ स्तरावरील आरोग्य यंत्रणेने चौकशी करुन तयार केलेला अहवाल उपसंचालक यांच्याकडे सादर केला आहे. यामध्ये दोषींवर कारवाई होण्याचे स्पष्ट संकेतही देण्यात आले आहेत.

तालुक्यात कार्यरत असलेल्या तीन प्राथमिक आरोग्य केंद्रातील रुग्णवाहिका सुस्थितीत असून पुर्णवेळ चालक उपलब्ध आहेत. त्याचबरोबर इंधनाची व्यवस्था वेळोवेळी योग्य पध्दतीने करण्यात येत आहे. या संदर्भात समाज माध्यमातून होणाऱ्या आरोपांकडे जनतेने लक्ष देवू नये. यंत्रणा जनतेच्या सेवेत तत्पर असल्याचे सांगितले.

या प्रकरणी चौकशी समितीत सहाय्यक उपसंचालक महाराष्ट्र राज्य डॉ. सूर्यवंशी, डॉ. मोहिते, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. भास्कर जगताप, उपजिल्हा शल्य चिकित्सक डॉ. ठोंबरे, वैद्यकीय अधिक्षक डॉ. बालाजी सगरे, वैद्यकीय अधिक्षक कामथे डॉ. असिम कुमार, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. अभिषेक गावंडे यांचा समावेश असल्याची माहिती यावेळी दिली.

रुग्णवाहिका ठेकेदारही कारवाईच्या कचाट्यात
रुग्णवाहिका कर्मचारी अत्यावश्यक सेवेमध्ये समाविष्ठ होत असले तरी गेल्या अनेक महिन्यांपासून तालुक्यात कार्यरत रुग्णवाहिकांच्या चालकांचे मानधनाची वेळेत न मिळण्याची समस्या जाणवून येत आहे. दोषी कर्मचाऱ्यांवर कारवाईचे संकेत मिळत असताना रुग्णवाहिका सेवा पुरविणाऱ्या ठेकेदारासही कारवाईचे कक्षेत यंत्रणा आणणार आहे का, असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित झाला आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:38 AM 15/May/2025