खेड : खेड-दापोलीतील मनोमनी आर्ट ग्रुप आणि निशंक महाराष्ट्र यांच्या वतीने येत्या १८ मे रोजी खेड येथे व्यंगचित्र कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे.
भरणे येथील श्री काळकाई देवी मंदिरात सकाळी ९ ते सायंकाळी ५ या वेळेत ही व्यंगचित्र कार्यशाळा आणि करिअर मार्गदर्शन वर्ग होणार आहे.
बाळासाहेब ठाकरे यांचे प्रत्यक्ष मार्गदर्शन लाभलेले, हास्य विनोदी साहित्यिक पु. ल. देशपांडे यांच्या कौतुकास पात्र ठरलेले आणि अनेक पुरस्कार विजेते महाराष्ट्रातील ज्येष्ठ व्यंगचित्रकार संजय मिस्त्री या कार्यशाळेला मार्गदर्शन करणार आहेत.
साध्या व सहजसोप्या रेषांमधून व्यंगचित्र कसे साकारता येते, हे २०१८ मधील दापोली येथील कार्यशाळेतदेखील त्यांनी दाखवून दिले होते. अॅनिमेशन आणि आर्किटेक्चर या क्षेत्राकडे प्रवेश घेण्यासाठी विविध प्रवेश परीक्षांकडे पालक आणि विद्यार्थीवर्गाचा कल वाढत आहे.
त्यामुळे बालवयातच चित्रकलेची आवड आणि प्रावीण्य संपादन करण्यासाठी ही कार्यशाळा मार्गदर्शक ठरणार आहे.
या कार्यशाळेत अगदी लहान मुलांपासून ते अगदी वयोवृद्धांपर्यंतची मंडळी सहभाग घेऊ शकतील, असे आयोजकांनी सांगितले. व्यंगचित्र कार्यशाळेचे आणखी एक खास आकर्षण म्हणजे जागतिक आरोग्य संघटनेचे सदस्य (डब्ल्यूएचओ) आणि जेनोटॉक्सिकोलॉजीमध्ये डॉक्टरेट (पीएचडी) केलेले प्रशांत बबन झाटे हे मुलांचे कॅन्सरपासून संरक्षण या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत. या कार्यशाळेच्या प्रवेशासाठी नोंदणी करणे आवश्यक आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:28 PM 15/May/2025













