अडरे : चिपळूण पोलिस स्थानकात ‘जीवन विकास सेवा संघ, चिपळूण’ यांच्यावतीने पोलिस कर्मचाऱ्यांसाठी मानसिक आरोग्यविषयक विशेष उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात ध्यान, ब्रेन बस्टर थेरपी आणि थोडक्या स्वरूपातील फिजिओथेरपी सेवा देण्यात आली.
मानसशास्त्रज्ञ दीपक माळकरी यांनी पोस्ट ट्रॉमॅटिक स्ट्रेस डिसऑर्डर, तणाव, नैराश्य, झोपेच्या समस्या, चिडचिड, सततची चिंता इत्यादी मानसिक अडचणींवर सखोल माहिती व मार्गदर्शन दिले. ब्रेन बस्टर थेरपीचा अनुभव देऊन ध्यानातून मनःशांती साधण्याचे तंत्र त्यांनी प्रत्यक्ष शिकवले. या उपक्रमात व्हायब्रेशन मशीन, इलेक्ट्रिक सिम्युलेशन मशीन आणि मॅट्सचा वापर करून सेवा देण्यात आली.
या कार्यक्रमाच्या आयोजनात उपविभागीय पोलिस अधिकारी राजेंद्रकुमार राजमाने यांचा विशेष पुढाकार होता. यावेळी संस्थेच्या अध्यक्ष संगीता ओतारी, आरोग्य विभागाच्या पूजा पुजारी, रविना पवार आणि समाजसेवक रवींद्र शिंदे उपस्थित होते. दीपक माळकरी यांनी पुढील काळात पोलिस कर्मचाऱ्यांसाठी मोफत समुपदेशन सेवा पुरवण्यात येईल, असेही सांगितले. पोलिस कर्मचाऱ्यांनी या कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:49 PM 16/May/2025













