मंडणगडमध्ये लाचखोरीचा पर्दाफाश : मंडळ अधिकारी, तलाठी आणि शिपाई एसीबीच्या जाळ्यात!

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्याच्या मंडणगड तालुक्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) मोठी कारवाई करत, मंडळ अधिकारी, ग्राम महसूल अधिकारी आणि एका शिपायास लाच घेताना रंगेहाथ पकडले आहे. जमिनीच्या फेरफार नोंदीसाठी एकूण ७५,००० रुपयांची लाच मागितल्याचा आरोप असून, यापैकी ४५,००० रुपये यापूर्वीच ऑनलाइन स्वीकारले होते.

काय आहे प्रकरण?
मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार यांनी त्यांच्या पत्नीच्या नावे मंडणगड तालुक्यातील शेणाळे येथे लिलावामध्ये एक शेतजमीन खरेदी केली होती. या जमिनीची फेरफार नोंद करून सातबारा उतारा मिळवण्यासाठी त्यांनी संबंधित मंडळ अधिकारी आणि तलाठी यांच्याकडे संपर्क साधला.

या कामासाठी उप कोषागार कार्यालय, मंडणगड येथील शिपाई मारुती भोसले याने तक्रारदाराकडे ५०,००० रुपयांची मागणी केली होती. त्यापैकी ४५,००० रुपये मारुती भोसले याने ऑनलाइन स्वीकारले होते. मात्र, संपूर्ण रक्कम न मिळाल्याने मंडळ अधिकारी यांनी फेरफार नोंद रद्द केली होती.

रंगेहाथ पकडले!
आज, २७ मे २०२५ रोजी, तक्रारदार यांनी मंडळ अधिकारी अमित शिगवण (म्हाप्रळ), ग्राम महसूल अधिकारी श्रीनिवास श्रीरामे (सजा म्हाप्रळ, अतिरिक्त कार्यभार सोवेली) आणि मारुती भोसले (शिपाई, उप कोषागार कार्यालय, मंडणगड) यांची भेट घेतली. यावेळी मंडळ अधिकारी अमित शिगवण यांनी प्रलंबित काम पूर्ण करण्यासाठी ३०,००० रुपयांची लाच मागितली.

Happy journey marathi

लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, रत्नागिरी युनिटने सापळा रचून पडताळणी दरम्यान, तक्रारदारांकडून ३०,००० रुपये लाच स्वीकारताना तिघांनाही रंगेहाथ पकडले. स्वीकारलेल्या लाचेतील १५,५०० रुपये अमित शिगवण यांनी स्वतःकडे ठेवले, तर उर्वरित १४,५०० रुपये त्यांनी तलाठी श्रीनिवास श्रीरामे यांना दिले. या प्रकरणी मंडणगड पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

कारवाई करणारे अधिकारी:
ही यशस्वी कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, ठाणे परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक शिवराज पाटील, अपर पोलीस अधीक्षक संजय गोवीलकर आणि सुहास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली, तसेच पोलीस उप अधीक्षक अविनाश पाटील, रत्नागिरी घटक यांनी पार पाडली.