संगमेश्वर : रत्नागिरी येथे सध्या वरिष्ठ श्रेणी प्रशिक्षण सुरू आहे. रविवारी (ता. ८) प्रशिक्षणाचा सहावा दिवस होता. त्यासाठी चिपळूणहून रत्नागिरीला निघालेल्या शिक्षकांच्या खासगी बसला भीषण अपघात झाला. या अपघातामुळे सगळेच सहकारी शिक्षक धास्तावले आहेत. त्यामुळे १० जूनला पेठवडगाव-मिणचे (कोल्हापूर) येथे होणारे प्रशिक्षण रद्द करून ते रत्नागिरीतच द्यावे, अशी मागणी डायटला दिलेल्या निवेदनातून केली आहे.
या प्रशिक्षणात कला क्रीडा विभागातील समाविष्ट असलेल्या ११ शिक्षकांना १० दिवसांच्या प्रशिक्षणापैकी ७ दिवस प्रशिक्षण हे रत्नागिरीत करून सातव्या दिवशी सायंकाळी ५.३० सुटल्यावर पुढील ३ दिवसांसाठी कोल्हापूर जिल्ह्यातील पेठवडगाव जवळ मिणचे येथे प्रशिक्षण दिले जाणार आहे. त्यासाठी १० ला सकाळी ९ च्या आत मिणचे येथे उपस्थित राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. मात्र, निवळी येथील सहकाऱ्यांच्या झालेल्या अपघातामुळे शिक्षकांची मानसिकता बिघडली आहे. त्यामुळे कला, क्रीडा शिक्षकांनी जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य सुशीलकुमार शिवलकर, राहुल बर्वे यांना व कोकण पदवीधर आमदार निरंजन डावखरे, शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांना निवेदन दिले आहे.
त्यावर संबंधित व्यवस्थेबद्दल बदल करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करू, असे आश्वासन आमदार निरंजन डावखरे, आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी दिले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:20 AM 09/Jun/2025













