चिपळूण : वहाळफाटा येथील महावितरणचे ७५ लाखांचे विद्युत खांब चोरीला

चिपळूण : महावितरण कंपनीच्या वहाळफाटा येथील मोकळ्या जागेत ठेवलेले सुमारे ७५ लाखांचे ४५० विद्युत खांब चोरीला गेल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी सावर्डे पोलीसात तीन ट्रेलर चालकांसह चौघांवर गुन्हा दाखल केला आहे. चोरी प्रकरणी अखिलेश कुमार लालताप्रसाद प्रजापती (४७. मूळ रा. विरार, पालघर तर सध्या रा. भरणेनाका, ता. खेड) यांनी सावर्डे पोलिसात तक्रार दिली होती.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ट्रेलर चालक सुरेश खारोल (रा. राजस्थान), दोन अनोळखी ट्रेलर चालक तसेच कंपनीचा माल घेऊन जाण्यासाठी सांगणारा साहील मलिक अशी गुन्हा दाखल झालेल्या चौघा संशयितांची नावे आहेत. हा चोरीचा प्रकार ६ जून रोजी सायंकाळी ५ रात्री १२ वाजण्याच्या सुमारास घडला होता.

सावर्डे महावितरण सबस्टेशनच्या शेजारी सचिन वारे यांच्या वहाळफाटा येथील मोकळ्या जमिनीत ४५० इलेक्ट्रीक पोल ठेवलेले होते. हे विद्युत खांब कंपनीच्या संमतीशिवाय संबंधितांनी चोरून नेले. या खंबाची किंमत ७४ लाख ८४ हजार ९८ रूपये आहे.

चोरीला गेलेल्या साहित्यात १० लाख ६१ हजार ३४९ रूपये किंमतीचे १५२/१५२ साईजचे १० मीटर लांबीचे ४४ लोखंडी इलेक्ट्रीक खांब, ८ लाख ६ हजार ७२७ रूपये किंमतीचे १५२/१५२ साईजचे १३ मीटर लांबीचे २७ लोखंडी इलेक्ट्रीक खांब, ५६ लाख १६ हजार २२ रूपये किंमतीचे १००/११६ साईजचे १० मीटर लांबीचे ३७९ लोखंडी इलेक्ट्रीक खांब यांचा समावेश आहे. या चोरीप्रकरणी चौघांवर गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सावर्डे पोलीस करीत आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:26 AM 09/Jun/2025