स्वामित्व गावठाण योजनेंतर्गत चिपळुणातील ७८९ लाभार्थ्यांना लाभ

चिपळूण : तालुक्यातील ५२ गावांमध्ये पिढ्यांपिढ्या सरकारी जमिनीवर राहणारी कुटुंबे स्वामित्व गावठाण योजनेंतर्गत त्या जागांचे मालक झाले आहेत. चिपळुणातील कोसंबी गावामध्ये सनद वाटपाचा कार्यक्रम नुकताच झाला. तालुक्यातील ७८९ लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळाला. अजून ३२ गावांतील पिढ्या‌न्पिढ्या सरकारी जमिनीवर राहणाऱ्या ४८२ लोकांना त्यांच्या घराखालील जागेचे मालक होण्याची प्रतीक्षा आहे. अशी माहिती भूमी अभिलेख खात्याचे शिरस्तेदार संजय पाटोळे यांनी दिली.

रत्नागिरी जिल्ह्यामध्ये अनेक कुटुंबांची घरे सरकारी जागेवर आहेत. घर नावावर असले तरी त्या घराखालची जमीन सरकारी मालकीची असल्याने त्या कुटुंबांना शासकीय कामकाजांमध्ये फारच अडचणी येतात. पिढ्यांपिढ्या राहणाऱ्या या कुटुंबांना स्वामित्व गावठण योजनेचे लाभ मिळून त्या जागा संबंधित कुटुंबांच्या नावावर होत आहेत. चिपळूणातील कोसंबी गावातील अशा कुटुंबांना आमदार निकम यांच्या हस्ते सनद मिळाल्या. यावेळी चिपळूण भूमी अभिलेखचे उपअधीक्षक संतोष भागवत, शिरस्तेदार संजय पाटोळे, उपसरपंच दत्ता गुरव उपस्थित होते. आता संबंधित भू धारक त्या राहत्या जागेचे कायदेशीर मालक बनले आहेत.

चिपळूण तालुक्यात अशा भूधारक गावांची संख्या ८४ असून त्यातील ५२ गावांमधल्या भू धारकांना स्वामित्व गावठाण योजनेचा लाभ मिळाला आहे. उर्वरित ३२ गावांमध्ये ही प्रक्रिया सुरू आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:34 AM 09/Jun/2025

Tata harrier