ऐतिहासिक यशवंतगडाच्या दुरुस्तीत ‘भ्रष्टाचार’? निकृष्ट कामामुळे किल्ल्याला धोका, ठेकेदार रद्द करण्याची मागणी!

रत्नागिरी : राजापूर तालुक्यातील ऐतिहासिक घेरा यशवंतगडाच्या दुरुस्तीच्या कामात मोठा घोळ झाल्याचा आरोप करत या कामाची उच्चस्तरीय चौकशी करावी आणि निकृष्ट कामामुळे संबंधित ठेकेदाराचा ठेका तात्काळ रद्द करावा, अशी मागणी राजापूरच्या काँग्रेस नेत्या आणि माजी विधान परिषदेच्या आमदार ॲड. हुस्नबानू खलिफे यांनी केली आहे. आज त्यांनी जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांची भेट घेऊन या संदर्भात निवेदन दिले. यावेळी साखरी नाटे आणि नाटे परिसरातील अनेक शिवप्रेमी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

निकृष्ट कामाचा पर्दाफाश
ॲड. खलिफे यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिले की, घेरा यशवंतगडाच्या दुरुस्तीचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे झाले आहे. यामुळे सध्या हा किल्ला पर्यटकांसाठी धोकादायक बनला आहे. दुरुस्ती केलेल्या भागामध्ये सुरक्षिततेच्या दृष्टीने कोणतीही उपाययोजना ठेकेदाराकडून करण्यात आलेली नाही. तसेच, धोक्याची सूचना देणारे फलक देखील लावण्यात आलेले नाहीत. त्यामुळे दुरुस्त केलेला किल्ल्याचा कोणताही नवीन भाग कोसळल्यास मोठी दुर्घटना घडण्याची भीती त्यांनी व्यक्त केली.

ॲड. खलिफे यांनी पुढे सांगितले की, किल्ल्याच्या दुरुस्तीच्या कामासाठी वापरलेले चिरेबंदी बांधकाम, ज्याला चुना आणि वाळू लावण्यात आले आहे, ते अक्षरशः हातामध्ये येत आहे. हे बांधकाम चांगल्या दर्जाचे नसल्याचे स्पष्टपणे दिसून येत आहे. ही वस्तुस्थिती असून, जिल्हाधिकाऱ्यांनी स्वतः किल्ल्याच्या ठिकाणी येऊन तात्काळ पाहणी करावी आणि संबंधित अधिकाऱ्यांना योग्य त्या सूचना द्याव्यात, अशी मागणी त्यांनी केली.

जिल्हाधिकाऱ्यांकडून पाहणीचे आश्वासन
या भेटीवेळी जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांनी घेरा यशवंतगडाच्या पडझड झालेल्या घटनास्थळी येऊन प्रत्यक्ष पाहणी करणार असल्याचे आश्वासन दिले आहे. या भेटीला राजापूरचे माजी लोकनियुक्त नगराध्यक्ष ॲड. जमीर खलिफे, नाटेचे सरपंच संदीप बांदकर, देवेंद्र बांदकर, निलेश बांदकर, मलिक गडकरी, नौशाद धालवेलकर, मजीद सायेकर, सुरेश बांदकर, आदी ग्रामस्थ आणि शिवप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी साखरी नाटे आणि नाटे ग्रामपंचायतीच्या वतीने देखील किल्ल्याच्या निकृष्ट दर्जाच्या कामाच्या संदर्भात निषेध व्यक्त करत निवेदन सादर करण्यात आले. या गंभीर आरोपामुळे ऐतिहासिक घेरा यशवंतगडाच्या दुरुस्ती कामाची चौकशी होऊन दोषींवर कारवाई होते का, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:08 10-06-2025