संगमेश्वर : कुंभारखाणीत आज शंभर वृक्षांची लागवड करणार

सावर्डे : वटपौर्णिमा म्हणजे नात्यांतील श्रद्धा, विश्वास आणि प्रेमाची नव्याने जाण करून देणारा एक सण. या सणाचे औचित्य साधून कुंभारखाणी बुद्रुक (ता. संगमेश्वर) येथील ग्रामस्थांनी एकत्रित येऊन परिसरात वड, पिंपळ, गुलमोहर या शंभरहून अधिक वृक्षांची लागवड करण्याचा अनोखा निर्धार केला आहे. त्या अनुषंगाने ग्रामस्थांची मंगळवारी (ता. १०) सकाळी साडेअकरा वाजता ग्रामपंचायत कार्यालयात बैठक आयोजित केली.

या बैठकीला महिलांबरोबर पुरुषांनासुद्धा त्याची माहिती मिळावी, या हेतूने पुरुषांनाही बैठकीस आमंत्रित केले आहे. बैठकीत पर्यावरणाचे महत्त्व व त्याची जपणूक करण्याबद्दल विचारविनिमय करण्यात येणार आहे. त्यानंतर ग्रामपंचायत कार्यालयाशेजारील वडाच्या झाडाची विधिवत पूजा केली जाणार आहे. गावातील खालचे भराडे, कोंडउंबरठ, कोंडराई, मधलीवाडी या वाड्यातील पुरुष व महिला उपस्थित राहणार आहेत. संदीप सुर्वे, सुनील सुर्वे आदी ग्रामस्थ कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रयत्नशील आहेत.

गावात सीडबॉल या पर्यावरणावर आधारित चित्रपटाचे चित्रीकरण झाले. त्याची सुरुवात वड, पिंपळ या पारंपरिक निसर्गाचा समतोल राखणाऱ्या शंभर वृक्षांची लागवड करण्याने होणार आहे. गुलमोहर वृक्षांच्या बियांचे वितरण केले जाईल. ग्रामस्थांना त्यांनी रोपण केलेल्या वृक्षांची देखभाल व काळजी घेण्याबाबत मार्गदर्शन केले जाईल, असे सामाजिक कार्यकर्ते विकास सुर्वे यांनी सांगितले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:19 AM 10/Jun/2025