राजापूर : कोंड्ये येथे एका रात्रीत पाच घरफोड्या

राजापूर : राजापूर तालुक्यातील कोंड्ये येथील शिक्षक कॉलनीसह अन्य दोन वाड्यांमध्ये अज्ञात चोरट्यांनी एकाच रात्रीत पाच घरे फोडून सुमारे सात लाखांचा मुद्देमाल पळवल्याने तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. मंगळवार दिनांक ९ जून २०२५ च्या मध्यरात्री ही चोरी झाल्याने राजापूर पोलिसांसमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे.

राजापूर तालुक्यातील कोंड्ये येथील शिक्षक कॉलनीसह बौद्धवाडी व मधलीवाडी येथील रहिवासी कोंड्ये हायस्कूलचे मुख्याध्यापक अशोक महाडेश्वर, अॅड. मुरलीधर मोरे, योगेश मोरे, शशिकांत लाड, अविनाश रामचंद्र तावडे अशी पाच घरे फोडून चोरट्यांनी सुमारे सात लाख रुपयांचा ऐवज लंपास केला आहे. याबाबतची माहिती येथील ग्रामस्थांनी राजापूर पोलिसांना देताच राजापूर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक अमित यादव आपल्या टीमसह घटनास्थळी दाखल झाले आहेत.

गेल्या अनेक दिवसानंतर राजापुरात मोठी घरफोडी झाल्याने पुन्हा चोरट्यांनी आपला मोर्चा राजापूरकडे वळवला आहे. एकाच रात्रीत पाच बंद घरे चोरट्यांनी फोडल्याने राजापूर पोलिसांसमोर मोठे आव्हान उभे झाले आहे. आता या चोरी प्रकरणाचा राजापूर पोलीस कसून तपास करत असून चोरट्यांसह मुद्देमाल कधी पोलिसांच्या हाती येईल याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:51 11-06-2025

Physciobot