“आम्ही भारतात जिवंत परत येऊ असं वाटलं नव्हतं”; रशिया-युक्रेन युद्धात लढलेल्या कर्नाटकच्या तिघांनी सांगितली आपबीती!

रशियन आर्मीत काम करण्यासाठी पाठवण्यात आलेले कर्नाटकमधील तीन तरूण पुन्हा भारतात परतले आहेत. या तिघांना भारतातील एजंटने सुरक्षा रक्षकाची नोकरी देतो, असं सांगून रशियात पाठवलं होतं. रशियातून परत आल्यानंतर आता या तरुणांनी ‘द इंडियन एक्सप्रेस’शी संवाद साधला. यावेळी बोलताना त्यांनी त्यांची आपबिती सांगितली. सय्यद इलियास हुसैनी, मोहम्मद समीर अहमद आणि सुकैन मोहम्मद अशी या तिघांची नावे आहेत. या तिघांना परराष्ट्र मंत्रालयाच्या मदतीने भारतात परत आणण्यात आलं आहे.

इंडियन एक्सप्रेसने दिलेल्या वृत्तानुसार, भारतातील काही एजंटने कर्नाटकातील तीन तरुणांना रशियात सुरक्षा रक्षकाची नोकरी देतो, असं सांगून त्यांची फसवणूक केली होती. तसेच त्यांना महिन्यांना ७० हजार रुपये दिले जातील, असं आश्वासनही त्यांनी दिलं होतं. त्यांना गेल्या डिसेंबर महिन्यात रशियात पाठवण्यात आलं. मात्र, ज्यावेळी तिघेही रशियात दाखल झाले, तेव्हा आपली फसवणूक झाल्याचं त्यांच्या लक्षात आलं.