चिपळूण : ढाकमोळी-सुतारवाडी कॉजवे वाहतुकीसाठी बंद

चिपळूण : पुण्यामधील इंद्रायणी पूल पडल्यानंतर राज्यातील अनेक पुलांबाबत प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. ढाकमोळी सुतारवाडी-धनगरवाडीला जोडणाऱ्या पुलाची दयनीय अवस्था झाली असून, पावसाळ्यात हा पूल प्रशासनाने वाहतुकीसाठी बंद केला आहे. त्यामुळे ग्रामस्थांची गैरसोय होत आहे. या पुलाचे काम नव्याने झाले पाहिजे अन्यथा मोठी दुर्घटना घडू शकते. नादुरुस्त पुलांचा प्रश्न जिल्हा परिषद बांधकाम विभागाने मार्गी लावावा, अशी मागणी माजी सरपंच दादा लाड यांनी केली आहे.

ढाकमोळी- सुतारवाडी धनगरवाडीला जोडणाऱ्या कॉजवेचा पत्रा तुटून पडल्याने व लोखंडी अँगल गंजल्याने पावसाळ्यात दळणवळणाचा प्रश्न निर्माण झाला आहे. येथे कॉजवेची दुरुस्ती करावी व भविष्यात येथे पूल बांधून हा प्रश्न तातडीने निकाली लावावा, अशी मागणी जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम सभापती बाळशेठ जाधव यांनी केली होती. माजी सरपंच दादा लाड यांनी बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांची भेट घेऊन वस्तुस्थिती निदर्शनास आणली असताना त्यांनी उडवाउडवीची उत्तरे देत ग्रामपंचायतीशी संपर्क साधा, असे सांगून हात झटकल्याचे दादा लाड यांनी सांगितले.

ढाकमोळी सुतारवाडी व धनगरवाडी दुर्गम भागात असून, येथे जाण्यासाठी जिल्हा परिषदेचा लोखंडी कॉज आहे. खूप वर्षांपूर्वी बाधलेला हा कॉजवे आता मोडकळीस आला आहे. याचा एक पत्रा सध्या पडल्याने सुतारवाडी, धनगरवाडी, तुरंबत वाडदेवाडी येथील लोकांना पावसाळ्यात या कॉजवेवरून वाहतूक करणे अवघड झाले आहे. या कॉजयेची ताडीने दुरुस्ती करावी, अशी मागणी लाड यांनी ग्रामपंचायतीकडेही केली होती; परंतु सरपंचांनी निधी नसल्याचे सांगत आपण वरिष्ठ कार्यालयाला पत्र दिल्याचे स्पष्ट केले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:40 AM 21/Jun/2025

Kore Mobile