गुहागर : पाटाचे पाणी शेतात नेण्यासाठी डांबरीकरण रस्ता फोडला

गुहागर : शेतात पाणी घेण्यासाठी एका गाव पुढाऱ्याने चक्क डांबरीकरण झालेला रस्ता खोदल्याचा प्रकार गुहागर नगरपंचायत क्षेत्रातील कीर्तनवाडी कालवा रोड येथे झाला आहे. त्यामुळे नागरिक व वाहनचालकांतून नाराजी व्यक्त होत आहे. नगरपंचायतीने यावर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.

पंधरा वर्षांपूर्वी कीर्तनवाडी सभागृह ते खालचापाट भाटी रोड येथे असणाऱ्या पाटबंधारे विभागाच्या कालव्याच्या बाजूने पायवाट होती. पंधरा वर्षांपूर्वी कीर्तनवाडीत पहिल्यांदा आमदार निधीतून खडीकरण करण्यात आले व त्यानंतर काही वर्षांनी डांबरीकरण झाले. दहा वर्षांपूर्वी खालचापाट भाटी येथून ३६० मीटर रस्ता झाला. दोन महिन्यांपूर्वी नव्याने मधल्या भागातही डांबरीकरण करण्यात आले आहे. संपूर्ण एक किलोमीटरचा रस्ता आता डांबरी झाला असताना चांगल्या रस्त्यावर केवळ शेतात पाणी घेण्यासाठी चक्क रस्ता फोडण्यात आला आहे. रात्रीच्या वेळी हा रस्ता फोडल्याचे येथील नागरिकांनी सांगितले.

या रस्त्याच्या खालील भागात मोठ्या प्रमाणात शेती केली जाते. पायवाट असताना डोंगरातून येणारे पाणी कमी पाऊस असताना शेतात वळविण्यासाठी पायवाट फोडून पाणी घेतले जायचे. रस्ता होतानाच येथील शेतकऱ्यांनी लोखंडी किंवा प्लास्टिक पाईप टाकून ठेवणे गरजेचे होते. मात्र, ते न केल्याने आता डांबरी रस्ताच फोडण्याचा प्रकार गाव पुढाऱ्याने केला आहे. आता नगर पंचायत याबाबत कोणती कारवाई करते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:49 PM 01/Jul/2025