रत्नागिरी : शेअर मार्केटमध्ये ३४ लाखांची फसवणूक करणाऱ्या संशयिताला अटक

रत्नागिरी : शेअर मार्केटमध्ये जास्त रक्कमेचा परतावा देण्याचे आमिष दाखवून तीन महिलांची ३४ लाख ८९ हजारांची संशयिताने फसवणूक केली. शहर पोलिस ठाण्यात संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे. न्यायालयाने चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.

प्रथम जयेश खानविलकर (रा. गोडावून स्टॉप, नाचणे, रत्नागिरी) असे फसवणूक करणाऱ्या संशयिताचे नाव आहे. ही घटना मार्च २०२४ ते १७ ऑक्टोबर २०२४ या कालावधीत कल्पवृक्ष रत्नागिरी हाऊसिंग सोसायटी, हिंदू कॉलनी, रत्नागिरी येथे घडली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, संशयिताने फिर्यादी शिल्पा सुभाष धुंदूर (वय ७५, रा. कल्पवक्ष, रत्नागिरी हाऊसिंग सोसायटी, हिंदू कॉलनी जवळ, रत्नागिरी) यांच्याकडून ३० लाख व सविता सदानंद बाणे (रा. शिरगाव बाणेवाडी, रत्नागिरी) यांची ३ लाख १४ हजार, तर फिर्यादी शिल्पा धुंदूर यांची वहिनी स्नेहा शरदचंद्र अभ्यंकर (रा. वरची आळी, रत्नागिरी) यांचे एक लाख ७५ हजार घेऊन शेअर्समध्ये गुंतवणूक करून व त्यातून जास्त रक्कमेचा परतावा देण्याचे आमिष दाखवून ३४ लाख ८९ हजार रुपयांची फसवणूक केली.

दरम्यान, जास्त परतावा आणि गुंतवणूक केलेली रक्कमही परत न मिळाल्याने आपली फसवणूक झाल्याचे त्या महिलांच्या लक्षात आल्यानंतर फिर्यादी शिल्पा धुंदूर यांनी रविवारी (ता. २९) शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तपासात पोलिसांना या संशयितावर याआधीही गुन्हा दाखल असल्याचे पुढे आले आहे. न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.

ही कामगिरी शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सतीश शिवरकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस फौजदार दीपक साळवी, पोलिस उपनिरीक्षक सतीश शिंदे, सागर वाळुंजकर, पोलिस हेड कॉन्स्टेबल पंकज पडेलकर, अमित पालवे, अमोल भोसले, शरद जाधव यांनी केली. अधिक तपास शहर पोलिस अमंलदार करत आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:19 AM 02/Jul/2025