संगमेश्वरात पिंपळ कोसळून घरांसह फळझाडांचे नुकसान

संगमेश्वर : रामपेठ (संगमेश्वर) येथील मराठी शाळेजवळ उभा असलेला साधारण तीनशे वर्षांपूर्वीचा पिंपळवृक्ष पावसाळी वाऱ्यामुळे कोसळून मोठे नुकसान झाले. ही दुर्घटना सोमवारी पहाटे अंदाजे चार ते साडेचारच्या सुमारास घडली.

या घटनेत उदय संसारे, संजय संसारे व मिलिंद संसारे यांच्या घराच्या मागच्या बाजूस हा प्राचीन पिंपळवृक्ष कोसळल्याने घराचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. केवळ घरच नव्हे तर परिसरातील पोफळी, नारळ, पोफळ आणि इतर फळझाडेही वृक्षाच्या तडाख्याने जमीनदोस्त झाली आहेत. या झाडांपासून संबंधित कुटुंबीयांना आर्थिक उत्पन्न मिळत होते. त्यामुळे त्यांचे आर्थिक नुकसानही मोठ्या प्रमाणावर झाले आहे.

या घटनेची माहिती संसारे कुटुंबीयांनी तत्काळ शासकीय यंत्रणेला दिली असून, पंचनाम्याची व मदतीची मागणी त्यांनी केली आहे. प्रशासनाने याकडे त्वरित लक्ष देत योग्य ती मदत द्यावी, अशी स्थानिकांकडून मागणी करण्यात येत आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:33 AM 02/Jul/2025