रत्नागिरी : या हुसेन… या हुसेन, नबी के नवासे जिंदाबाद, नारे तकबीर अल्लाहू अकबर असा जयघोष करीत रत्नागिरी शहरासह लांजा, राजापूर, दापोली, खेड, चिपळूण यासह विविध तालुक्यात ६ जुलै रोजी पावसाच्या सरी झेलत ढोल ताशाच्या गजरात मानाच्या दोन्ही पंजास आकर्षक सजावट करून ताबूतची मिरवणुक काढण्यात आली. मिरवुणक पाहण्यासाठी तरुण, तरुणी, महिला, ज्येष्ठ नागरिक व हिंदू बांधवांनी मोठी गर्दी केली होती.
आषाढी एकादशी व मोहरम सण एकाच दिवशी आल्यामुळे दोन्ही धर्मातील समाज बांधवांनी सामाजिक एकोपा जपत मोठ्या शिस्तीत मिरवणुका काढल्या. मोहरमचा उत्सव रत्नागिरी शहर व जिल्ह्यात हिंदू मुस्लिम भाविकाच्या सहभागातून पारंपारिक पध्दतीने साजरा करण्यात आला. दरम्यान, मुस्लिम समाजाच्या मोहरम महिन्यास २७ जूनपासून सुरूवात झाली. दररोज रात्री इमामे हुसेन यांच्या बलिदानाच्या आख्यायिकेचे वाचन मुस्लिम मोहल्ल्यात झाले. मोहरमनिमित्त रत्नागिरी शहरासह विविध तालुक्याच्या ठिकाणी बडे पीर, छोटे पीर यांच्या पंजाची स्थापना करण्यात आली होती. जुलै महिन्यात काही शहरासह काही तालुक्याच्या ठिकाणी प्रवचन झाले. रविवारी लांजा शहरात दुपारी ३ च्या सुमारास ताबूतची मिरवणूक निघाली. ताबूतला आकर्षक अशी सजावट करण्यात आली होती. मुजावरवाडी पासून बाजारसमिती व शहरात इतर ठिकाणी ढोल ताशांच्या गजरात, या हुसेन, या हुसेनच्या जयघोषात ताबूतची जंगी मिरवणूक काढण्यात आली. दुपारी सेतवडे गाव, तालुका
रत्नागिरी येथे ताजियाची मिरवणूक काढण्यात आली. सायंकाळी रत्नागिरी शहरातील धनजीनाका, कोकण नगर, राजिवडा भागासह राजापूर, खेड, दापोली, चिपळूण, गुहागर, संगमेश्वर, मंडणगड तालुक्यात विविध ठिकाणी ताबुतची मिरवणुका काढून सांगता करण्यात आली.
लांजा शहरात ५ व ६ जुलै रोजी मोठ्या उत्सवात ताबूतच्या मिरवणुका काढण्यात आल्यानंतर मंगळवारी ८ जुलै रोजी महाप्रसादाचे वाटप करण्यात येणार आहे. आषाढी एकादशी व मोहरम सण एकाच दिवशी असल्यामुळे पोलिस प्रशासनाच्यावतीने शहर, जिल्ह्यात बंदोबस्त ठेवण्यात आला होता. सकाळी दिंडीलाही पोलिस बंदोबस्त होता. ताबूत मिरवणुकीवेळी शहरासह तालुयात चोख बंदोबस्त दिसून आला.
मिरवणूक पाहण्यासाठी मुस्लिमांसह हिंदू बांधवांची गर्दी; जपला सामाजिक सलोखा मोहरम सणानिमित्त ताबूतची मिरवणूक काढण्यात येत असते. या मिरवणुकीत मोठ्या संख्येने हिंदू बांधव ही उपस्थित असतात. मिरवणूक पाहण्यासाठी मुस्लिम बरोबरच हिंदू बांधवांची उपस्थिती मोठी असते. कोकणातही हिंदू बांधवांनी मिरवणुकीत उपस्थित राहून सामाजिक एकोपा, धार्मिक सलोखा टिकवून ठेवण्याची परपंरा कायम ठेवली आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:37 AM 07/Jul/2025














