गुहागर : वेळंब पांगारी दरम्यान मोठ्या प्रमाणात वृक्षतोड

गुहागर : वेळंब फाटा- आबलोली मार्गावर वेळंब पांगारीदरम्यान, विनापरवाना मोठ्या प्रमाणात वृक्षतोड सुरु आहे. वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी संबंधित वृक्षतोड व्यापाऱ्याला नवीन वृक्ष लागवडीबाबत माहिती देण्यासाठी बोलवले असतानाही त्या व्यापाऱ्याने त्यांना ठेंगा दाखविला आहे. त्यामुळे वृक्षतोडीवरुन व्यापारी आणि वन विभाग यांच्यात जुंपल्याचे दिसून येत आहे.

गुहागर तालुका अलिकडे वृक्षतोडीमुळे भकास होत आहे. गुहागर-विजापूर महामार्गालगतच मोठ्या प्रमाणात वृक्षतोड सुरु असते. गेल्या महिन्यात विसापूर येथे मोठ्या प्रमाणात सागाच्या लाकडाची तोड झाली होती. या नंतर वाहतुकीची कोणतीही परवानगी नसताना ही तोड झाल्याने गुहागर वन विभागाने कारवाई केली होती. वेळंब पांगारी दरम्यान रस्त्यालगत ऐन पावसाळ्यात वृक्षतोड
होत आहे. वन विभागाकडे याबाबत चौकशी केली असता, या व्यापाऱ्याला आम्ही वृक्षलागवडीसंदर्भात माहिती देण्यासाठी बोलावल्याचे सांगितले. मात्र, अद्याप त्याच्याकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नसल्याचे वनपाल यांनी सांगितले.

दरम्यान, मोठ्या प्रमाणावर होत असलेल्या या वृक्षतोडीकडे दुर्लक्ष झाल्याचे दिसून येत असून अजूनही येथे तोड सुरु आहे. त्यामुळे याबाबत वन विभागाकडून कारवाई होते का? याकडे तालुकावासीयांचे लक्ष लागून राहिले आहे.

दरम्यान, राज्य सरकार वृक्ष लागवडीला प्रोत्साहन देऊन उपक्रम राबविण्यासाठी मदतही करीत आहे. ज्या ठिकाणी वृक्षतोड होते तेथे संबंधित तोड व्यापाऱ्याकडून वृक्ष लागवड करणे गरजेचे असते. मात्र, संबंधित याकडे दुर्लक्ष करताना दिसून येत आहेत. त्यांच्याकडून केवळ वृक्षतोडीवरच भर दिला जात असल्याचे समोर येत आहे.

Shanti real estate 1

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:22 AM 22/Jul/2025