सोमेश्वर मांडवकरवाडी येथे खवले मांजराची सुटका

रत्नागिरी : तालुक्यातील सोमेश्वर येथील मांडवकरवाडी येथे सोमवारी सकाळी एका खवले मांजराची नायलॉनच्या जाळीतून यशस्वीपणे सुटका करण्यात आली. निसर्गप्रेमी रोहन वारेकर यांच्या सतर्कतेमुळे आणि वनविभागाच्या तात्काळ प्रतिसादामुळे या वन्यप्राण्याचा जीव वाचला.

समीर सुभाष भातडे यांच्या आंबा कलम बागेतील कुंपणाला लावलेल्या नायलॉनच्या जाळीत एक खवले मांजर अडकल्याची माहिती श्री. रोहन वारेकर यांना मिळाली. त्यांनी तात्काळ वनविभागाला याची सूचना दिली. माहिती मिळताच वनविभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. चिखलात आणि नायलॉनच्या जाळ्यात अडकलेल्या खवले मांजराला त्यांनी सुखरूप बाहेर काढले.

पशुवैद्यकीय अधिकारी, रत्नागिरी यांच्यामार्फत खवले मांजराची तपासणी करण्यात आली. ते सुस्थितीत असल्याचे निश्चित झाल्यावर त्याला त्याच्या नैसर्गिक अधिवासात सोडून देण्यात आले.

या बचावकार्यात पाली वनपाल श्री. न्हानू गावडे, जाकादेवी वनरक्षक श्रीमती शर्वरी कदम, आणि प्राणी मित्र श्री. महेश धोत्रे यांचा सहभाग होता. रत्नागिरी (चिपळूण) येथील माननीय विभागीय वन अधिकारी श्रीमती गिरिजा देसाई आणि सहाय्यक वनसंरक्षक श्रीमती प्रियंका लगड यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबवण्यात आली. श्री. प्रकाश सुतार आणि परिक्षेत्र वन अधिकारी, रत्नागिरी यांनीही या कामगिरीत महत्त्वाची भूमिका बजावली.

Tata sierra

अशा प्रकारच्या घटना घडल्यास किंवा कोणताही वन्य प्राणी अडचणीत सापडल्यास तात्काळ वनविभागाच्या टोल फ्री क्रमांक १९२६ किंवा ९४२१७४१३३५ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन विभागीय वन अधिकारी, रत्नागिरी, श्रीमती गिरिजा देसाई यांनी केले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:46 22-07-2025