संगमेश्वरात पोषण आहाराच्या धान्याचे अनियमित वितरण

संगमेश्वर : शालेय पोषण आहारासाठी लागणाऱ्या धान्याचे वितरण वेळेत होत नसल्यामुळे तालुक्यातील काही प्राथमिक शाळांच्या व्यवस्थापन समित्यांनी तसेच संगमेश्वर तालुका शिक्षणसंस्थाचालक संघटनेने उपोषण करण्याची तयारी सुरू केली.

शाळांना मिळणारा पोषण आहार शाळा सुरू होऊन आता एका महिन्यापेक्षा जास्त कालावधी संपत आला तरीही अद्याप मिळालेला नाही. त्यामुळे आता पोषण आहार कुठला शिजवायचा आणि कुठून आणून द्यायचा, असा प्रश्न शाळा व्यवस्थापनाला पडला आहे. पोषण आहार वेळेत मिळत नसल्यामुळे प्राथमिक, माध्यमिक शाळातील व्यवस्थापन समित्या, माता पालकसंघामधून गेले महिनाभर तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. पोषण आहाराचे धान्य, साहित्य फेब्रुवारी महिन्यांपासून मिळालेले नसल्याने अजून किती दिवस उसनवारी करायची, असा प्रश्न केला जात आहे.

तसेच इतर धान्यांकरिता, साहित्यासाठी लागणारा पैसा कसा उभा करायचा, याचीही चिंता शाळा व्यवस्थापनासमोर उभी ठाकली आहे. विद्यार्थ्यांना सकस आहार मिळावा, ते शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त व्हावेत, यासाठी शासनाने शालेय पोषण आहार योजना (माध्यान्ह भोजन योजना) आणली; मात्र संगमेश्वर तालुक्यासह अन्य तालुक्यांत पोषण आहाराचा तुटवडा आहे. पोषण आहार वितरणात सातत्याने अनियमितपणा येत असल्याने ठेकेदाराचा ठेकाच रद्द करावा, अशीही मागणी जोर धरत आहे.

संगमेश्वर तालुक्यातील ३३० पेक्षा अधिक जिल्हा परिषद, तर माध्यमिकच्या ३४ पेक्षा अधिक शाळांमध्ये पोषण आहार दिला जातो.

Hotel star caters

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:27 AM 22/Jul/2025