गावतळे : मागील काही दिवसांपासून गावतळे बाजारपेठेसह ३२ गावांतील वीजपुरवठा सतत खंडित होत आहे. त्यामुळे नागरिकांसह व्यापारी त्रस्त झाले आहेत. बुधवारी खंडित झालेला गावतळे व असोंड गावातील वीजपुरवठा काल सकाळी साडेदहा वाजता पूर्ववत झाला. अनियमित वीजपुरवठा पूर्ववत करण्यासाठी आवश्यक उपाययोजना महावितरणकडून केल्या जात नसल्याने व्यापारी आणि ग्रामस्थ संतप्त झालेले आहेत.
मागील अडीच महिन्यांत दर दिवसाला दहा ते पंधरा वेळा वीजप्रवाह खंडित होत असल्यामुळे गावतळे बाजारपेठेतील व्यापारी हैराण झालेले आहेत. सततच्या होत असलेल्या त्रासामुळे व्यापाऱ्यांना आर्थिक भुर्दंड बसत आहे. एकदा खंडित झालेला वीजपुरवठा सुरळीत होत आहे, असे वाटत असतानाच पुन्हा वीजपुरवठा खंडित होत आहे. रात्रीही दोन ते चारवेळा वीज जात असल्याने मोठी गैरसोय होत आहे. ३० जुलैच्या रात्री खंडित झालेला वीजपुरवठा तासाभरात पूर्ववत होईल, असे वाटत होते. पण तसे झाले नाही. त्यामुळे व्यापाऱ्यांनी महावितरणशी संपर्क साधला. गावतळे आणि असोंड या दोन गावांना वीजपुरवठा करणाऱ्या वाहिनीवर बिघाड होत असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. काल सकाळी १०:३० वाजण्याच्या दरम्यान वीजप्रवाह सुरळीत झाला.
याबाबत ग्रामस्थांचे म्हणणे आहे की, महावितरणला मुख्य बिघाड सापडलेला नाही. त्यामुळेच सातत्याने वीजप्रवाह खंडित होत आहे. महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी वेळीच लक्ष घालून ग्राहकांना दिलासा द्यावा व वारंवार खंडित होणारा वीजपुरवठा सुरळीत करावा अशी मागणी केली. याबाबत वाकवली येथील उप अभियंता श्री. सागवेकर म्हणाले, विद्युत खांबांवरील डिस्कमध्ये झालेला बिघाड गुरुवारी सकाळी सापडला. त्यामुळे खंडित झालेला वीजपुरवठा आता पूर्ववत होईल. त्यासाठी आम्ही उपाययोजना केल्या आहेत. यापुढे वीजप्रवाह खंडित होणार नाही.
या व्यावसायिकांना बसतोय फटका
सतत वीजपुरवठा खंडित होत असल्याने ग्रामस्थ आक्रमक झालेले आहेत. ४ ते ८ तास वीज जात असल्यामुळे गावतळेसह परिसरातील फणसू व इतर लहान बाजारपेठेतील आइस्क्रीम व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. विजेवर अवलंबून असलेले वेल्डर, इलेक्ट्रिकल, मेकॅनिक, सुतार अशा व्यावसायिकांचे मोठे नुकसान होत आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:47 AM 01/Aug/2025














