कलम बांधणीच्या कौशल्यातून विद्यार्थ्यांनी स्वयंपूर्ण बनावे : सुमित सावंत

पाचल : आज रोपवाटिकांची संख्या वाढत आहे. फळबागेच्या लागवडीकडे शेतकऱ्यांचा कल आहे. हमखास उत्पन्न देणाऱ्या फळझाडांची मागणी बाजारपेठेत वाढत आहे. अशा काळात आपण कलम बांधणीकडे व्यावसायिक दृष्टीने पाहिले पाहिजे. रोजगाराची आणि व्यवसायाची संधी म्हणून योग्य कलमांची बांधणी केल्यास येणाऱ्या काळात आपल्याला आर्थिक निर्भर होता येणार आहे. म्हणूनच विद्यार्थ्यांनी कलम बांधणीचे कौशल्य आत्मसात करून स्वयंपूर्ण बनावे, असे आवाहन सुमित सावंत यांनी केले.

मनोहर हरी खापणे महाविद्यालयात आयक्यूएसी विभाग व राष्ट्रीय सेवा योजना विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जिल्हास्तरीय कौशल्य आधारित एकदिवशीय ‘कलम बांधणी प्रात्यक्षिक व रोजगाराच्या संधी’ या विषयावरील कार्यशाळेत प्रमुख मार्गदर्शक म्हणून ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य डॉ. पी. एस. मेश्राम होते.

यावेळी आयक्यूएसी विभाग प्रमुख डॉ. ए. डी. पाटील, राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे कार्यक्रम अधिकारी डॉ. विकास पाटील आदी उपस्थित होते. प्रास्ताविक डॉ. विकास पाटील यांनी केले. प्रा. एन. बी. कोकरे यांनी फळबागेचे अर्थशास्त्र समजून दिले. डॉ. ए. डी. पाटील यांनी अशा कार्यशाळातून विद्यार्थ्यांनी रोजगाराचे कौशल्य आत्मसात करावे असे आवाहन केले. विद्यार्थ्यांनी या कार्यशाळेतील ज्ञान आपल्या दैनंदिन जीवनात उपयोगात आणावे, असे आवाहन प्र. प्राचार्य डॉ. पी. एस. मेश्राम यांनी केले. दुपारच्या सत्रात सुमित सावंत यांनी आंबा, काजू, गुलाब आदी रोपांचे कलम कसे बनवावे हे प्रात्यक्षिक विद्यार्थ्यांना दाखवले. सूत्रसंचालन डॉ. विकास पाटील, तर आभार प्रदर्शन डॉ. बी. टी. दाभाडे यांनी केले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:21 PM 02/Aug/2025