लांजा : अकरावी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेत गोंधळ

लांजा : अकरावी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेच्या उडालेल्या गोंधळामुळे लांजा शहरासह तालुक्यातील तीनशेहून अधिक विद्यार्थ्यांचे भवितव्य अडचणीत सापडले आहे. अकरावी प्रवेश होईल की नाही यामुळे विद्यार्थीवर्ग चिंताग्रस्त झाला असून संतप्त झालेल्या पालकांनी सोमवारी तहसीलदार व गटशिक्षणाधिकारी यांच्याशी चर्चा करून निवेदन सादर करत अकरावी प्रवेश प्रक्रियेबाबत लवकरात लवकर मार्ग काढा. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक नुकसानीला प्रशासन जबाबदार राहील, असा सज्जड इशारा संतप्त पालकांनी प्रशासनाला दिला.

शैक्षणिक वर्ष २०२४-२५ मध्ये दहावीची परीक्षा होऊन राज्य शिक्षण विभागाकडून निकालही लवकर जाहीर करण्यात आले. मात्र निकाल लवकर जाहीर करून अकरावी प्रवेश ऑनलाईन प्रक्रियेत येणारे अडथळे सोडवण्यात मात्र अपयश आल्याचे दिसून येते आहे. त्यामुळे अकरावीसाठी प्रवेश मिळत नसल्याने विद्यार्थ्यांमध्ये कमालीची नाराजी पसरली आहे. अकरावी प्रवेश प्रकियेच्या पार्श्वभूमीवर तालुक्यातील पालकवर्ग व लांजा न्यू एज्युकेशन सोसायटीचे संचालक यांनी लांजा तहसीलदार व गटशिक्षणाधिकारी यांची सोमवारी भेट घेऊन विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भवितव्याचा प्रश्न तत्काळ मार्गी लावावा, अशी मागणी केली. निवेदन सादर करताना पालकांनी आपल्या संतप्त भावना यावेळी व्यक्त केल्या. शासनामार्फत यावर्षीपासून अकरावीसाठी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

मात्र या ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेमुळे लांजा शहरासह तालुक्यातील तीनशे ते साडेतीनशे विद्यार्थ्यांच्या प्रवेश प्रक्रियेचा खोळंबा निर्माण झाला आहे. शाळा, महाविद्यालये सुरू होऊन दोन महिन्यांचा कालावधी लोटला तरी अकरावीच्या विद्याथ्यर्थ्यांची प्रवेश प्रक्रिया सुरू झालेली नाही. त्यामुळे पालकांसह विद्यार्थी वर्ग चिंतेत सापडला आहे. यावर्षीचे शैक्षणिक वर्ष वाया जाते की काय अशी भीती आता विद्यार्थ्यांसह पालकांमध्ये निर्माण झाली आहे.

शासनाच्या शैक्षणिक प्रवेश प्रक्रियेला कंटाळलेल्या लांजा तालुक्यातील पालकवर्ग व एज्युकेशन सोसायटी संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी अखेर सोमवारी लांजा तहसील कार्यालय आणि गटशिक्षणाधिकारी यांची भेट घेतली. यावेळी पालकांनी आपल्या संतप्त भावना व्यक्त केल्या.

Physciobot

अकरावी प्रवेश मिळत नसल्याने आपल्या पाल्याने नैराश्यातून काही वेगळे पाऊल उचलले तर त्याची सर्वस्वी जबाबदारी संबधित प्रशासनाची राहील असा संतप्त इशारा पालकांकडून देण्यात आला. सध्या ऑनलाईन प्रवेशाची चौथी फेरी सुरू आहे. या फेरीमध्येही विद्यार्थी संख्या कमी आहे. अजूनही तालुक्यात बरेच विद्यार्थी प्रवेशाविना वंचित आहेत. यानंतर पाचवी फेरी सुरू होईल. त्या फेरीमध्ये सुद्धा शिल्लक विद्यार्थ्यांचा प्रवेश झाला नाही तर बरेचसे विद्यार्थी प्रवेशाविना राहतील व त्यामुळे त्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ शकते असेही पालकांनी सांगितले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:43 PM 06/Aug/2025