Breaking : चिपळूणमध्ये सेवानिवृत्त शिक्षिकेची निर्घृण हत्या, शहरात खळबळ

चिपळूण : चिपळूण तालुक्यातील धामणवणे गावात एका सेवानिवृत्त शिक्षिकेची तिच्या राहत्या घरात निर्घृण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना आज सकाळी उघडकीस आली आहे. ६८ वर्षीय वर्षा जोशी, असे मृत शिक्षिकेचे नाव असून त्या घरात एकट्याच राहत होत्या. या घटनेमुळे संपूर्ण चिपळूण शहरात खळबळ उडाली आहे.

नेमकी घटना काय?

आज सकाळी शेजाऱ्यांनी वर्षा जोशी यांच्या घराचा दरवाजा उघडून पाहिला असता त्यांना आतमध्ये त्यांचा मृतदेह विवस्त्र आणि हात-पाय बांधलेल्या अवस्थेत आढळून आला. तातडीने त्यांनी पोलिसांना याची माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच चिपळूण पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली.

पोलिसांनी काय सांगितले?

Naadi pariksha

पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, मृतदेह पाहून हा खून असल्याचे स्पष्ट झाले आहे. मृतदेहावर अनेक जखमा असून, हा खून अत्यंत क्रूरपणे करण्यात आल्याचे दिसून येत आहे. खून कोणी आणि कोणत्या कारणाने केला याचा तपास सुरू आहे. तसेच, आरोपींनी पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याचेही समोर आले आहे. घरामध्ये लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याची हार्डडिस्कही आरोपींनी काढून नेली आहे.

पोलीस अधीक्षकांचे लक्ष

या घटनेचे गांभीर्य लक्षात घेत जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांनी स्वतः घटनास्थळी धाव घेतली आहे. तपासाला गती देण्यासाठी डॉगस्कॉड पथकालाही पाचारण करण्यात आले आहे. पोलीस सध्या विविध दिशेने तपास करत असून, लवकरच आरोपींना पकडण्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. वर्षा जोशी यांचे पती काही वर्षांपूर्वीच वारले होते आणि त्या सेवानिवृत्त झाल्यानंतर घरात एकट्याच राहत होत्या, अशीही माहिती समोर आली आहे.

या घटनेमुळे शहरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, पोलीस या प्रकरणाचा कसून तपास करत आहेत.