रत्नागिरी : ‘गोगटे जोगळेकर’च्या वरदा मुळ्येला आदर्श विद्यार्थिनी पारितोषिक

रत्नागिरी : गोगटे जोगळेकर महाविद्यालयात विविध पारितोषिके देऊन विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला. यामध्ये वरदा मुळये हिला (कै.) उन्मेष घाटे आदर्श विद्यार्थी पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आले.

महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी, वक्ते गजानन पळसुले-देसाई आणि डॉ. मकरंद साखळकर यांच्या हस्ते पारितोषिक वितरण झाले. महाविद्यालयातील गुणी, हुशार, अभ्यास आणि अभ्यासेत्तर उपक्रमात अग्रेसर असणाऱ्या विद्यार्थी किंवा विद्यार्थिनीस आदर्श विद्यार्थी पारितोषिक दिले जाते. वरदा हिने भारत सरकारच्या विज्ञान व तंत्रज्ञान विभागाची इन्स्पायर शिष्यवृत्ती प्राप्त केली. याच विभागाने रामकृष्ण मोरे महाविद्यालय, आकुर्डी, पुणे येथे आयोजित केलेल्या शिबिरासाठी तिची निवड झाली. तसेच आयआयटी मद्रास संशोधन शिष्यवृत्ती २०२५ साठी देशभरातून निवडलेल्या विद्यार्थ्यांमध्ये तिची निवड झाली. यात तिला १५ हजार रुपये शिष्यवृत्तीने सन्मानित करण्यात आले आहे. याबद्दल तिला हे पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आले.

(कै.) प्रभाकर करमरकर गणित पारितोषिक गणित विषयातील प्रथम वर्ष विज्ञान शाखेतील प्रथम प्रणव कदम याला दिले. द्वितीय व तृतीय वर्षांसाठी शिवम कीर या विद्यार्थ्यास प्रदान केले. लोकमान्य टिळक पारितोषिक आणि गणित / संस्कृत विभागाने दिलेले पारितोषिक बारावीमध्ये गणित, संस्कृत विषय घेऊन प्रथम आलेल्या विद्यार्थ्यांस दिले जाते. यावर्षी गणित विषयासाठी हे पारितोषिक अनम नाईक याला गौरवण्यात आले. (कै.) गणेशशास्त्री घाटे पारितोषिक आणि मराठी विभागाने दिलेले पारितोषिक द्वितीय वर्ष कला शाखेत मराठी विषयात प्रथम आलेल्या गौरी कीर हिला देण्यात आले.

वक्तृत्व स्पर्धेचा निकाल

गोगटे जोगळेकर महाविद्यालय आयोजित लोकमान्य टिळक पुण्यतिथी वक्तृत्व स्पर्धेतील पारितोषिक प्राप्त विद्यार्थी जान्हवी जोशी (प्रथम क्रमांक), रिझा हरचिरकर (द्वितीय क्रमांक), रूहिना राजवाडकर (तृतीय क्रमांक) आणि ओंकार आठवले (उत्तेजनार्थ) यांना मान्यवरांच्या हस्ते गौरवण्यात आले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:54 AM 09/Aug/2025