एसटी पार्सलची जबाबदारी आता चालक-वाहकांवर

रत्नागिरी : महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या एसटी पार्सल सेवेच्या माध्यमातूनत पाठवलेल्या वस्तू वेळेत पोहोचत नसल्यामुळे तसेच वस्तू गहाळ होण्याच्या तक्रारी होत असल्यामुळे आता एसटी महामंडळाने पार्सलची जबाबदारी चालक-वाहकांवर देण्यात आली आहे. तशा सूचना महाव्यवस्थापकांनी नियोजन आणि पणन विभागाच्या विभाग नियंत्रकांना सूचना दिल्या आहेत. राज्यातील काही जिल्ह्यांना पत्र पोहोचले असून त्याची अंमलबजावणी ही सुरू झाली आहे. अद्याप काही जिल्ह्यांना पत्रक आले नसल्याचे सांगण्यात आले.

एसटी विभागाकडून प्रवासी सेवेबरोबरच पार्सलची सेवा दिली जाते. त्यासाठी राज्य सरकारने १ जानेवारी २०२४ते ३० नोव्हेंबर २०२७ या कालावधीसाठी खाासगी कंपनीची नियुक्ती केली आहे. या कंपनीमार्फत वस्तू-सामान-साहित्यांची वाहतूक सेवा पुरवली जात आहे. मात्र मागील काही महिन्यांपासून या सेवेबाबत टीका होत आहे. वस्तू किंवा सामान वेळेत पोहोचवण्यासाठी वेळ होत आहे, काही वस्तू गहाळ होत असल्याच्या तक्रारी नागरिकांच्या आहेत. पावती न देता वस्तूंची परस्पर सेवा पुरवण्याचे प्रकार ही निदर्शनास आले. या पार्श्वभूमीवर मुंबईत एसटी महामंडळ उपाध्यक्षांच्या उपस्थितीत बैठक पार पडली. चर्चेअंती आता पार्सलची जबाबदारी वाहक-चालकावर देण्यात आल्याचे समजते.

रत्नागिरी विभागास अद्याप पत्र नाही
पार्सलची जबाबदारी चालक-वाहकांवर निश्चित केल्याचा निर्णय यासंदर्भात झाला असून आगार व्यवस्थापक संदीप पाटील यांना विचारले असता ते म्हणाले अद्याप तरी आम्हाला तसे पत्र प्राप्त झाले नाही. त्यामुळे याविषयी काय सांगता येणार नाही. विभाग नियंत्रक प्रज्ञेश बोरसे यांना भ्रमणध्वनीद्वार संपर्क केला असता त्यांचा फोन बंद होता.

पावतीची खातरजमा करा
पार्सलवर परवानाधारक कंपनीची पावती आहे का नाही, याची खातरजमा करून घ्यावी, जीएसटी क्रमांक असलेली पावती स्वीकारावी, कागदावर लिहून दिलेल्या पावत्यांचा स्वीकार करू नये, अशा सूचना महामंडळाकडून चालक आणि वाहकांना सूचना देण्यात आल्या आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:3 PM 13/Aug/2025