रत्नागिरीतील चार तालुक्यात २९ साकव धोकादायक

रत्नागिरी : दक्षिण रत्नागिरीतील चार तालुक्यांमध्ये विविध गावे, वाड्यांना, वस्त्यांना जोडणारे २९ साकव धोकादायक बनले असून त्याची दुरुस्ती आवश्यक बनली आहे. ३८६ साकव दुरुस्तीला आले आहेत. जिल्हा परिषदेच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने केलेल्या पाहणी अहवालामध्ये हे स्पष्ट झाले आहे. यासाठी सुमारे ३० कोटी ९२ लाखांच्या निधीची गरज असून तसा प्रस्ताव ग्रामविकास विभागाला पाठविण्यात आला आहे.

रत्नागिरी, संगमेश्वर, लांजा आणि राजापूर या चार तालुक्यातील साकवांची ही परिस्थिती आहे. वर्षांनुवर्षे बांधण्यात आलेले हे साकव अनेक गावांना तालुका, जिल्ह्याशी जोडून ठेवतात. वाडी, वस्ती आदी भागातील ग्रामस्थांना आरोग्य, शिक्षण, उपजीविका आदी सुविधांपर्यंत पोहचण्याचा हा एक मार्ग आहे. या चार तालुक्यांमध्ये सुमारे ४१५ साकव आहेत. त्यापैकी संगमेश्वर तालुक्यातील ८, रत्नागिरीतील १. लांजा तालुक्यातील १७आणि राजापुरातील ३ असे २९ साकव धोकादायक बनले आहेत. त्यांची दुरुस्ती अत्यावश्यक आहे, यासाठी सुमारे ८ कोटी ९२ लाख निधीची आवश्यकता आहे. सर्वांत जास्त लांजा तालुक्यातील साकवांचा समावेश असून, त्यासाठी ५ कोटी ९२ लाख निधी लागणार आहे.

दुरुस्ती करणे आवश्यक असलेल्या साकवांची संख्या ३८६ आहे. यामध्ये संगमेश्वर तालुक्यात ११५, रत्नागिरीमध्ये ९४, लांज्यात ७५ आणि राजापूरात १०२ साकव दुरुस्त करण्याची आवश्यकता आहे. या साकवांच्या दुरुस्तीसाठी साधारण २२ कोटी रुपये अपेक्षित आहेत. यामध्ये सर्वांत जास्त संगमेश्वर तालुक्यातील साकवांची संख्या आहे. धोकादायक आणि दुरुस्ती करणे आवश्यक असलेल्या ४१५ साकवांना एकूण ३० कोटी ९२ लाख एवढ्या निधीची गरज आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:47 PM 11/Aug/2025